रोमहर्षक सामन्यात रॉबटरे बॉटिस्टाकडून पराभूत; फेडरर, नदाल यांची दुसऱ्या फेरीत आगेकूच

मेलबर्न : १४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत तब्बल पाच वेळा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारूनही उपविजेतेपदावर समाधान मानणारा इंग्लंडचा टेनिसपटू अँडी मरेला सोमवारी पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. रॉबटरे बॉटिस्टाने मरेची कारकीर्द संपुष्टात आणल्यामुळे त्याच्यासह स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या १० हजार प्रेक्षकांचे डोळेदेखील पाणावले.

तब्बल चार तास व नऊ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात स्पेनच्या २२व्या मानांकित बॉटिस्टाने झुंजार वृत्तीच्या मरेवर ६-४, ६-४, ६-७ (५-७), ६-७ (४-७), ६-२ अशी सरशी साधली. ३० वर्षीय बॉटिस्टाने संपूर्ण सामन्यात वर्चस्व मिळवीत मरेला प्रत्येक गुणासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे पहिले दोन सेट गमावूनदेखील मरेने हार न मानता सामन्यात दमदार पुनरागमन केले. मात्र पाचव्या व अखेरच्या सेटमध्ये मरेची देहबोली पूर्णपणे थकल्यासारखी जाणवत होती, याचाच फायदा उचलून बॉटिस्टाने फोरहॅण्डचा वेगवान फटका लगावत पाचवा सेट ६-२ असा जिंकून मरेच्या कारकीर्दीवर पूर्णविराम लावला.

त्यापूर्वी, जागतिक टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या स्पेनच्या द्वितीय मानांकित राफेल नदालने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थला ६-४, ६-३, ७-५ असे सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले. स्वित्र्झलडच्या गतविजेत्या तृतीय मानांकित रॉजर फेडररने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनवर ६-३, ६-४, ६-४ अशी मात केली. क्रोएशियाच्या सहाव्या मानांकित मरिन चिलिचनेसुद्धा बर्नार्ड टॉमिकवर ६-२, ६-४, ७-६ (७-३) असा विजय मिळवून दुसरी फेरी गाठली. अमेरिकेच्या नवव्या मानांकित जॉन इस्नरला मात्र रेली ओपेल्काकडून ७-६ (७-४), ७-६ (८-६), ६-७ (४-७), ७-६ (७-५) असा पराभव पत्करावा लागला.

महिला एकेरीत दुसऱ्या मानांकित अँजेलिक कर्बरने पोलोना हर्कागला ६-२, ६-२ अशी सहज धूळ चारली, तर गतविजेत्या कॅरोलिन वोझ्नियाकीने अ‍ॅलिसन व्हॅनवर ६-३, ६-४ असा विजय मिळवला. पाचव्या मानांकित स्लोन स्टीफन्सने टेलर टाउन्सेंडला ६-४, ६-२ असे नेस्तनाबूत केले.

प्रज्ञेशचे आव्हान संपुष्टात

पुरुष एकेरीत भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरनचे सोमवारी आव्हान संपुष्टात आले. मुख्य फेरीतील एक तास व ५२ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात अमेरिकेच्या फ्रान्सेस टिआफोने प्रज्ञेशला ७-६ (९-७), ६-३, ६-३ असे नमवून दुसरी फेरी गाठली.

अद्भुत, हे सारे काही अविश्वसनीय आहे. कारकीर्दीतील अखेरचा सामना पाहण्यासाठी आलेल्या सर्वाचे मी मनापासून आभार मानतो. ऑस्ट्रेलियात खेळायला मला नेहमीच आवडते. माझ्याकडे टेनिसला देण्यासाठी जितके होते, तितके मी दिले. मात्र आता थांबण्याची वेळ आली आहे!

– अँडी मरे, इंग्लंडचा टेनिसपटू