आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात अडकल्यानंतर बीसीसीआयने बडतर्फ केलेला क्रिकेटपटू अंकित चव्हाणला दिल्ली न्यायालयाने २ जूनला होणाऱ्या त्याच्या विवाहासाठी आठवडय़ाभरासाठी अंतरिम जामीन दिला आहे.
‘‘अंकितचा विवाह आधीच निश्चित झाला होता. त्यामुळे या आरोपीला विवाह साजरा करण्यासाठी परवानगी न देणे हे वधू आणि अन्य नातेवाईकांसाठी त्रासदायक ठरेल. कारण यात त्यांची काहीही चूक नाही,’’ असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनय कुमार यांनी अंकितला अंतरिम जामीन देताना सांगितले. त्याला ६ जूनला पुन्हा पोलिसांच्या स्वाधीन व्हावे लागणार आहे.
न्यायालयाने अंकितला एक लाख रुपयांच्या जाचमुचलका आणि दोन जामीनदारांच्या आधारे हा जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्याला पासपोर्ट जमा करण्याचे आणि भारत न सोडण्याचे निर्देश दिले आहेत. दंडाधिकाऱ्यांनी जामीन नामंजूर केल्यानंतर अंकितने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
चव्हाणचे वकील किशोर गायकवाड म्हणाले की, ‘‘विवाह ही पवित्र गोष्ट व्यक्तीच्या आयुष्यात एकदाच येते. चव्हाण आणि त्याच्याशी विवाह करणारी तरुणी एकमेकांना गेली चार वष्रे ओळखतात. १ जुलै २०१२ रोजी मुंबईत त्यांचा साखरपुडा झाला होता. आयपीएल संपल्यानंतर विवाह करण्याचे या दोन्ही कुटुंबीयांनी आधीच निश्चित केले होते.’’