ग्रामीण भाग आणि तिरंदाजी यांचे घट्ट नाते आहे. मोठय़ा शहरांमध्ये तिरंदाजीचा प्रसार व्हावा आणि खेळाची लोकप्रियता वाढावी या हेतूने देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत राष्ट्रीय तिरंदाजी मानांकन स्पर्धा होणार आहे. विशेष म्हणजे मुंबई क्रिकेटचे माहेरघर असणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्पर्धेतील शेवटचा टप्पा जवळच्या गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्याचाही संयोजकांचा विचार आहे.
ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेत क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्ड्सवर तिरंदाजीचे सामने झाले होते. धनुष्य, बाण आणि लक्ष्यवेध हे तिरंदाजीचे स्वरूप खेळपट्टीला नुकसानदायी नाही. स्पर्धा झाल्यानंतर काही तासांतच मैदान क्रिकेटसाठी सज्ज होऊ शकते.
‘‘लॉर्ड्सवरचा प्रयोग यशस्वी झाल्याने मुंबईत वानखेडे स्टेडियमवर स्पर्धा व्हावी, यासाठी प्रयत्नशील होतो. बहुतांशी सामने वानखेडे स्टेडियमवर तर सुवर्णपदकाचा एक सामना नजीकच्या गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यासाठी विविध स्तरावरील व्यक्ती तसेच संघटनांशी चर्चा सुरू आहे. दक्षिण मुंबईत वास्तव्य आणि अन्य खर्च वाढतो. त्यासाठी प्रायोजकाची शोधाशोध सुरू आहे. भारतात दिल्लीत लाल किल्ला, इंडिया गेट परिसरात, चेन्नईतील मरिना किनाऱ्यावर तिरंदाजी स्पर्धा झाल्या आहेत. मुंबईत प्रसिद्ध ठिकाणी ही स्पर्धा झाल्यास खेळाचा प्रसार होण्यासाठी मदत होईल,’’ असे राज्य सबज्युनियर स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईत आलेले महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांनी सांगितले.

भाजपची तिरंदाजी
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार विजयकुमार मल्होत्रा सलग ३२ वर्षे भारतीय धनुर्विद्या संघटनेच्या अध्यक्षपदी आहेत. राज्य संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत देशपांडे यांचा पक्षाशी थेट संबंध नसला तरी त्यांच्या मातोश्री भाजपच्या नेत्या आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार आहे. राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारचा शपथविधी सोहळा वानखेडे मैदानातच आयोजित झाला होता. मुंबईत स्पर्धा व्हावी यासाठी भाजप क्रीडा आघाडीही प्रयत्नशील आहे. यामुळे वानखेडे आणि गिरगाव चौपाटीवर आयोजनासाठी प्रशासकीय पातळीवर हिरवा कंदील मिळण्याचीच शक्यता दाट आहे.