नोएडातील युवा गिर्यारोहक अर्जुन वाजपेयी याने नेपाळ व चीन यांच्या सीमेवर असलेले मकालू (८ हजार ४८५ मीटर) या शिखरावर यशस्वी चढाई केली. आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंच असलेली चार शिखरे त्याने सर केली आहेत.

याबाबत अर्जुनची आई प्रिया यांनी ‘लोकसत्ता’ स सांगितले, गेली तीन वर्षे अर्जुन याला या शिखरावर चढाई करण्यात अपयश आले होते. तीनही वेळा आकस्मिक नैसर्गिक आपत्तींमुळे त्याला ही मोहीम स्थगित करावी लागली होती. यंदा तो आंतरराष्ट्रीय मोहिमेत सहभागी झाला होता. सोमवारी पहाटे तिसऱ्या कॅम्पवरून त्याने अंतिम चढाईस प्रारंभ केला. प्रतिकूल हवामान व बोचरे वारे याला तोंड देत त्याने सकाळी ११ वाजता या शिखरावर पाऊल ठेवले.

अर्जुन याने २०१० मध्ये एव्हरेस्ट शिखरावर चढाई करीत शिखर सर करणारा सर्वात लहान भारतीय गिर्यारोहक होण्याचा मान मिळविला होता. त्यानंतर त्याने २०११ मध्ये लोत्से (८ हजार ५१६ मीटर) व मनाल्सू (८ हजार १६३ मीटर) या शिखरांवरही यशस्वी चढाई केली. गतवर्षी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी तो मकालू शिखर मोहिमेवरच होता. तो सुदैवाने त्या वेळी वाचला होता. त्यानंतर त्याने स्पिती व्हॅली परिसरातील अनाम शिखरावर भूपेशकुमार याच्या साथीत यशस्वी मोहीम केली. त्यांनी या शिखरास दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव दिले होते. अर्जुन या २२ वर्षीय गिर्यारोहकाने जगातील आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंच असलेली बारा शिखरे सर करण्याचे ठरविले आहे.