डॉ. प्रकाश परांजपे

ब्रिज स्पर्धामध्ये नशिबापेक्षा कौशल्याला जास्त महत्त्व असतं, त्यामुळे सट्टेबाजीला वाव नसतो. पत्ते म्हणजे जुगार अशा आक्षेपाने ब्रिजविरुद्ध आघाडी उघडणारे मग आपल्या आक्रमणाची दिशा बदलतात. ब्रिज म्हणजे कठीण काम, डोकेफोड, असा प्रतिवाद पुढे करतात. ब्रिज खेळाडूंच्या सहवासात थोडा वेळ घालवला तर याचं उत्तर आपोआप मिळतं.

तीन ब्रिज खेळाडूंना जेव्हा खेळाकरिता चौथ्याची कमी असते, तेव्हा ते कुठल्याही दगडाला बाबापुता करून खेळायला बसवतात. तेव्हा ‘प’ला ‘प’ लावून ब्रिज हा सोप्पा खेळ बनतो. मी अशाच परिस्थितीत ब्रिज शिकलो. वसतिगृहातले जुनेजाणते ब्रिजपटू पदवी पुरी करून बाहेर पडले होते आणि उरलेल्यांमध्ये फक्त तिघांनाच ब्रिज येत होतं. मग चार तासात त्यांनी माझी तयारी करून घेतली आणि संध्याकाळचा सामना आम्ही चक्क जिंकलो!

चौकडी पुरी झाली असेल तर मात्र त्या गोटात प्रवेश मिळणं, हे कर्मकठीण असतं. रॉयल सिमला क्लबबाहेर पूर्वी जशी ‘कुत्रे आणि भारतीय नको’ अशी पाटी होती. तसा त्यातून  व्यक्त होणारा भाव त्या चौकडीच्या चेहऱ्यावर दिसतो. त्या चारांपैकी एकाला शह देण्यासाठी पाचवा तोलामोलाचा ब्रिज खेळणारा असावा लागतो.

पूर्वी ब्रिज घरोघरी खेळलं जायचं. मुंबईमध्ये रुईया हँडीकॅपसारखी स्पर्धा होती. त्यातले बहुतेक सामने घरी खेळले जायचे. अजूनही ब्रिटनमध्ये, इटलीमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा होतात. ठाणे जिल्हा ब्रिज संघटना पावसाळ्यात अशा स्पर्धा आयोजित करते. डोंबिवलीसारख्या ठिकाणी चार-पाच घरांत असे डाव आजही जमतात. नव्या खेळाडूंकरिता हे वातावरण पोषक असतं. मात्र बऱ्याच ठिकाणी आता फक्त क्लबमध्येच खेळ होतो, स्पर्धा दिमाखात होतात. त्यामुळे देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढतं, पण कौशल्याची देवाणघेवाण दुष्कर होते. त्यामुळे असेल कदाचित किंवा टीव्ही व स्मार्टफोनसारख्या माध्यमांमुळेही असेल कदाचित, जगभरच्या ब्रिज खेळाडूंची संख्या २०००च्या पुढच्या-मागच्या दशकांत रोडावत गेली होती. आता पुन्हा एकदा ब्रिजला बरे दिवस येण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. १९३०च्या दशकातल्या मंदीत ब्रिजला बाळसं धरलं होतं, तसंही पुन्हा घडेल कदाचित. पण या अर्थानर्थाच्या पलीकडेही ब्रिजची मजा आहे. मध्य प्रदेश राज्यातल्या रायबिडपुरा गावात ८० टक्के गावकरी गेली पन्नास वर्ष लहानांपासून थोरांपर्यंत ब्रिज खेळतात. वरचं चित्र रायबिडपुरा येथील खेळाचं आहे.

क्रिकेटचा पहिला चेंडू टोलवणं जितकं सोपं असतं, तितकंच ब्रिजचा डाव जमवणं. पुढच्या आठवडय़ापासून आपण ब्रिज कसं खेळायचं हे शिकू या!

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com