प्रशांत केणी

परकीय चलनाची समस्या तीव्रतेने भेडसावल्याने भारतीय फुटबॉल संघाला हिरवा कंदील देऊ नये, असा सल्ला १९६२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १५ दिवस आधी भारताच्या वित्त मंत्रालयाने दिला होता. दोनच वर्षांपूर्वी रोम ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या या एकमेव आशियाई संघासाठी हा धक्का होता, कारण भारताच्या फुटबॉल पथकात सर्वाधिक २२ खेळाडूंचा भरणा होता. मग अखिल भारतीय क्रीडा परिषद आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने फुटबॉलसाठी मोर्चेबांधणी केली; परंतु तरीही वित्तमंत्री मोरारजी देसाई यांनी पथकातील सात जणांना वजा करून हिरवा कंदील दिला. मग सुबीमल ऊर्फ चुनी गोस्वामीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जकार्तामध्ये पराक्रम गाजवून सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली. एक लाख प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियाला धूळ चारली. या स्पर्धेआधीपर्यंत भारतीय फुटबॉलचे यश २-३-५ या व्यूहरचनेमुळे साधले गेले होते; परंतु एस. ए. रहिम यांच्या मार्गदर्शनाखाली भारत ४-२-४ अशा व्यूहरचनेसह खेळणारा पहिला आशियाई संघ ठरला.

भारतीय फुटबॉलच्या इतिहासामधील १९६२चे एशियाड हे एक सोनेरी पान म्हणता येईल. चुनी, पी. के. बॅनर्जी आणि तुलशीदास बलराम ही त्रिमूर्ती या यशाची शिल्पकार. भारतीय फुटबॉलमध्ये या त्रिमूर्तीला ‘ब्रह्मा, विष्णू आणि महेश’ म्हटले जायचे; पण पाच फूट सात इंच उंचीचा सडपातळ बांधा, तंदुरुस्ती आणि मैदानी कौशल्य यामुळे एखाद्या चित्रपट अभिनेत्याप्रमाणेच चुनी यांना वलय प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांना फुटबॉलमधील उत्तम कुमार (बंगाली चित्रपटसृष्टीतील महानायक) म्हटले जायचे. तशी चुनी यांची उत्तम यांच्याशी घनिष्ठ मैत्री, तर माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि अभिनेते दिलीपकुमारसुद्धा आक्रमणपटू चुनी यांचा खेळ पाहण्यासाठी मैदान गाठायचे.
चुनी यांचा जन्म किशोरगंजमधील (आता बांगलादेशमध्ये) उच्चमध्यमवर्गीय कुटुंबात झाला. दक्षिण कोलकातामधील जोधपूर पार्क येथे त्यांचे निवासस्थान. १९४६ मध्ये वयाच्या आठव्या वर्षी ते मोहन बागानच्या कनिष्ठ संघात दाखल झाले आणि १९६८ पर्यंत ते सातत्याने खेळले. १९६० ते १९६४ या पाच हंगामांमध्ये त्यांनी संघाचे नेतृत्वही केले. मोहन बागानच्या सुवर्णकाळात ३१ जेतेपदे संघाने जिंकली होती. या यशाचे शिलेदार चुनी यांच्या खात्यावर २०० गोल जमा होते. त्या काळात टॉटेनहॅम हॉटस्परसारख्या अनेक नामांकित क्लब्सनी त्यांच्यापुढे खेळण्याचे प्रस्ताव ठेवले; परंतु चुनी यांनी ते नाकारले. त्या वेळी परदेशांमधील संघांमधून खेळण्यात अनिश्चितताच अधिक होती, असे त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले होते.

चुनी यांनी १९५६ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या सामन्यात भारताने चीनच्या ऑलिम्पिक संघाला १-० असे नामोहरम केले. त्यांनी ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, आशिया चषक आणि मेर्डेका चषक या स्पर्धामधील ५० सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. १९६२च्या यशानंतर १९६४च्या आशिया चषक आणि मेर्डेका चषक स्पर्धेत भारताला त्यांनी रुपेरी यश मिळवून दिले.
फुटबॉलप्रमाणेच क्रिकेट, टेनिस, कॅरम आणि हॉकीसुद्धा चुनी खेळायचे. दक्षिण क्लब कोर्टकडून त्यांनी टेनिसमध्येही लक्षवेधी कामगिरी केली; परंतु फुटबॉलमधील कारकीर्द निवृत्तीकडे वाटचाल करीत असतानाच क्रिकेटमध्ये त्यांनी पाय घट्ट रोवले. १९६२-६३च्या हंगामात पदार्पणानंतर पश्चिम बंगालकडून ४६ प्रथम श्रेणी सामने खेळताना १५९२ धावा आणि मध्यमगती गोलंदाजीच्या बळावर ४७ बळी त्यांच्या खात्यावर जमा आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बंगालने दोनदा रणजी करंडक अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली; परंतु दोन्ही वेळा मुंबईपुढे त्यांचा निभाव लागला नाही. १९६८-६९च्या अंतिम सामन्यात चुनी यांनी अनुक्रमे ९६ आणि ८४ धावा केल्या; परंतु अजित वाडेकर यांच्या शतकामुळे मुंबईला जेतेपद पटकावता आले. त्यानंतर १९७२-७३च्या हंगामात पुन्हा चुनी यांचे स्वप्न भंगले. सुनील गावस्कर आणि पॅडी शिवलकर यांच्या कामगिरीमुळे बंगालला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

डिसेंबर १९६६ मध्ये वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर असताना पूर्व-मध्य विभागाच्या संघाकडून सराव सामना खेळण्याची संधी चुनी यांना मिळाली. त्या काळात अव्वल संघ म्हणून गणल्या जाणाऱ्या विंडीजच्या संघावर डावाने विजय मिळवत पूर्व-मध्य विभागाने क्रिकेटजगताला आश्चर्याचा धक्का दिला होता. या सामन्यात चुनी यांनी आठ बळी घेतले होते. त्यांनी घेतलेल्या एका लक्षवेधी झेलमुळे कॅरेबियन कर्णधार गॅरी सोबर्ससुद्धा भारावले होते. आशियात असे झेल क्वचितच पाहायला मिळतात, असे सोबर्स यांनी कौतुकाने म्हटले होते. परंतु सोबर्स यांना कुठे ठाऊक होते की, चुनी एक आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूसुद्धा आहेत. उशिराने क्रिकेट कारकीर्द सुरू केल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू न होता आल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती.

निवृत्तीनंतर फुटबॉलपटू घडवण्याच्या प्रेरणेने चुनी यांनी टाटा अकादमीचे संचालकपद सांभाळले. अर्जुन, पद्मश्री अशा देशातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसह टपाल खात्यानेही त्यांच्यावर एक तिकीट प्रकाशित केले. भारतीय फुटबॉलला जागतिक नकाशावर मानाचे स्थान प्राप्त करून देण्यात चुनी यांचा सिंहाचा वाटा होता. आताच्या सुनील छेत्री, गुरप्रीतसिंग संधू यांच्या पिढीने त्या सुवर्णयुगाची पुनरावृत्ती के ल्यास तीच गोस्वामी यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
prashant.keni@expressindia.com