कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये मणिपूरच्या आठ जणांचा समावेश होता. त्यातील निम्मे खेळाडू हे मिनव्‍‌र्हा पंजाब फुटबॉल अकादमीत प्रशिक्षण घेतलेले होते. त्यामुळे या स्पर्धेची आणि भारतीय संघाच्या कामगिरीची जितकी चर्चा झाली, त्याहून अधिक चर्चा मिनव्‍‌र्हा अकादमीची झाली. बचावपटू अन्वर अली, मध्यरक्षक मोहम्मद शाहजहान, विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक गोल करणारा जॅक्सन सिंग आणि नोंगदाम्बा नाओरेम ही मिनव्‍‌र्हा अकादमीतून भारतीय संघाला मिळालेली चार रत्ने. मिनव्‍‌र्हा अकादमीच्या यशाचा आलेख इथेच थांबत नाही. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी आय-लीगच्या दुसऱ्या विभागीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते.

इंग्लंडचे रियान ब्रेवस्टर व जॅडन सँचो, जर्मनीचा जॉन फिएट-अर्प, अमेरिकेचा टीम वीह, ब्राझीलचा व्हिनिशियस ज्युनियर, इत्यादी खेळाडू फिफा कुमार विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने भारतीयांच्या परिचयाचे झाले. हे सर्व जण राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करत असले तरी त्यांची जडणघडण ही व्यावसायिक क्लबमधून झाली आहे. जगभरात क्लबमध्ये घडलेले खेळाडू राष्ट्रीय संघांचे प्रतिनिधित्व करतात. भारतात हीच प्रक्रिया नेमकी उलट आहे. राष्ट्रीय संघटनांना मोठय़ा प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करणे शक्य नसते आणि म्हणूनच त्यांना एक साहाय्यक हात लागतो. तो हात क्लबच्या रूपाने मिळण्याची अपेक्षा असते, परंतु भारतात त्यांची कमतरता आहे. मिनव्‍‌र्हाच्या रूपाने एक साहाय्यक उपक्रम राबवणारा क्लब देशासमोर आला आहे.

‘‘पंजाबमध्ये क्रिकेटच्या स्पर्धेसाठी कुणीही सहज पाच हजार रुपये देण्यास तयार होतात, परंतु फुटबॉल स्पर्धेसाठी कुणीच पुढे येत नव्हते. त्यात अकादमी स्थापन करण्यासाठीचा निधी कसा उभारायचा, हा प्रश्न होताच. मात्र आम्ही निराश झालो नाही आणि अथक प्रयत्नांनी व मजबूत इच्छाशक्तीच्या जोरावर ही अकादमी स्थापन केली,’’ असे अकादमीचे मालक रंजित बजाज यांनी सांगितले.

भारतातील अन्य अकादमींपेक्षा या अकादमीचे समाजमाध्यमांवरील चाहते सर्वाधिक आहेत. पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, मणिपूर येथील अनेक खेळाडू या अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत. अकादमीमुळे पंजाबचा फुटबॉल इतिहास पुन्हा प्रकाशझोतात आणला आहे. २०१५-१६च्या सत्रात मिनव्‍‌र्हा पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळले आणि आय-लीगच्या दुसऱ्या विभागीय स्पर्धेचे उपविजेतेपदही नावावर केले. नशिबाची साथ लाभल्यामुळे त्यांना आय-लीग स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आणि पहिल्या प्रयत्नात त्यांना नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. कामगिरीचा आलेख चढ-उतारांचा असेल, परंतु येथे घडणारा फुटबॉलपटू राष्ट्रीय सेवेसाठी सज्ज असेल हे नक्की, असे रंजित आत्मविश्वासाने सांगतात.

क्लबचा इतिहास

  • ’मिनव्‍‌र्हा अकादमी फुटबॉल क्लबचा इतिहास फार जुना आहे, अगदी १९७०पासूनचा. तेव्हा हा क्लब मिनव्‍‌र्हा एफसी म्हणून ओळखला जायचा.
  • ’मोहाली येथील मिनव्‍‌र्हा पब्लिक स्कूलने मिनव्‍‌र्हा एफसी या नावाने क्लबची स्थापना केली होती.
  • ’१९९०च्या दशकापर्यंत या क्लबने अनेक राष्ट्रीय अणि शालेय स्तरावरील स्पर्धा जिंकल्या. मात्र १९९०नंतर मिनव्‍‌र्हा स्कूल बंद पडली आणि या क्लबवर बंदी घातली गेली.
  • ’२००५मध्ये मिनव्‍‌र्हा पंजाब फुटबॉल क्लबची स्थापना झाली. याला मिनव्‍‌र्हा अकादमी नावानेही ओळखले जाते.

खेळण्याची शैली

मिनव्‍‌र्हा अकदमी म्हणजे तेथे आक्रमक खेळ आलाच. त्यांच्या चाहत्यांनाही हीच शैली प्रभावित करते. सामन्यात आघाडीवर असले तरीही बचावात्मक पवित्र्यात येणे त्यांना आवडत नाही.

पायाभूत विकास

फुटबॉलचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी अकादमी सातत्याने शिबिरे आणि फुटबॉल महोत्सवाचे आयोजन करते. त्यांनी पंजाबमधील अनेक शाळांसोबत करार केला असून मुलांना फुटबॉल प्रशिक्षण दिले जाते.

खेळाडूच फुटबॉलपटूची नस ओळखतो

रंजित बजाज यांनी २००५मध्ये या अकादमीची स्थापना केली. स्वत फुटबॉलपटू असल्याने रंजितने या अकादमीसाठी झोकून काम केले. देशातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धेतही त्याने चंदीगढतर्फे सहभाग घेतला. यात दोन कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा, सुब्रतो चषक, संतोष करंडक आणि डय़ुरँड चषक स्पर्धेचा सहभाग आहे. मलेशिया येथे १९९८ मध्ये झालेल्या आशियाई आंतरशालेय (१९ वर्षांखालील) स्पर्धेत त्याने फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ‘‘कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत माझ्या अकादमीतील मुलांना देशाचे प्रतिनिधित्व करताना पाहून अभिमान वाटतोय. या यशाने अकादमीतील इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळाली आहे,’’ असे रंजित यांनी अभिमानाने सांगितले.

सुरिंदर सिंग हे मिनव्‍‌र्हा अकादमीचे मुख्य व्यवस्थापक आहेत. आशियाई फुटबॉल महासंघाकडून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी २०१२ व २०१३ या काळात भारताच्या १३ व १५ वर्षांखालील संघाला मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या खेळाडूंमध्ये गुरप्रीत सिंग संधू, गुरिवदर सिंग, रॉबीन सिंग, सेहनाज सिंग आणि सुमीत पास्सी यांचा समावेश आहे.

क्लबविषयी थोडक्यात

  • ’क्लबचे नाव : मिनव्‍‌र्हा पंजाब फुटबॉल क्लब
  • ’स्थापना : २००५
  • ’घरचे मदान : गुरू नानक स्टेडियम, लुधियाना