क्रीडा क्षेत्रातील कुस्ती, बॉक्सिंग यांसारखे काही खेळ आजही पुरुषी वर्चस्वाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळेच इतर खेळांपेक्षा शारीरिक क्षमतेचा अधिक कस पाहणाऱ्या या खेळांकडे वळणाऱ्या मुलींची संख्या तशी कमीच. अशाच खेळांपैकी एक असलेला वेटलिफ्टिंगही (भारोत्तोलन) त्यास अपवाद नाही. कुस्ती, बॉक्सिंगमध्ये स्पर्धकाला एकमेकांशी लढावे लागते. प्रतिस्पध्र्याच्या ताकदीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपले डावपेच ठरवावे लागतात. वेटलिफ्टिंगमध्ये मात्र स्वत:ला, स्वत:शी झुंजावे लागते. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार निर्णय घ्यावा लागतो. प्रतिस्पध्र्याशी थेट भिडावे लागत नसल्याने एका दृष्टीने म्हणाल तर फायदेशीर, परंतु स्वत:च्या निर्णय क्षमतेची कसोटी लागत असल्याने कठीण असा हा खेळ. मर्दानी समजल्या जाणाऱ्या या खेळाच्या वाटेला जाण्यास बहुतांशी पुरुष मंडळीही धजावत नसताना शालेय स्तरापासून हा खेळ आत्मसात करण्यास मुलींना प्रवृत्त करणे, इतकेच नव्हे तर त्यांच्या खेळाचा दर्जा थेट आंतरराष्ट्रीय पदकाला गवसणी घालण्याइतपत उंचावत नेणे हे निश्चितच साधे काम नव्हे. हे यश नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील जय भवानी व्यायामशाळेने आणि त्यांचे क्रीडा शिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी मिळवले आहे.

मनमाडच्या छत्रे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १९९७पासून व्यवहारे हे कार्यरत आहेत. स्वत: उत्तम वेटलिफ्टिंगपटू असलेल्या व्यवहारे यांनी वेटलिफ्टिंगमध्ये खेळाडू घडवण्याचा ध्यास घेतला. शाळेत वेटलिफ्टिंगसाठी सुविधा नसल्याने त्यांनी जय भवानी व्यायामशाळेत विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. त्यावेळी साहित्याची वानवा असल्याने सुरुवातीस एक लाकडी काठी घेऊन, नंतर हळूहळू छोटे वजन घेऊन त्यांनी शिकवण्यास सुरुवात केली. व्यवहारे यांचे प्रयत्न पाहून छत्रे विद्यालयाचे पी. जी. धारवाडकर, व्यायामशाळेचे जयराम सानप, मोहन गायकवाड यांनी वेटलिफ्टिंगचा एक संच घेऊन दिला. त्यामुळे व्यवहारे अधिकच उत्साहित झाले. क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे आयोजित १९९७-९८च्या शालेय स्पर्धामध्ये त्यांचा विद्यार्थी अभिजीत सातपुतेने राज्य पातळीवर कांस्यपदक मिळवले. त्यानंतर मग व्यायामशाळा आणि छत्रे विद्यालय यांच्या सहकार्याने त्यांनी मनमाडमध्ये वेटलिफ्टिंगला बळ देण्यास सुरुवात केली. दरवर्षी अभ्यासात हुशार नसलेल्या काही मुलांना वेटलिफ्टिंगसाठी ते बोलवू लागले. अशा प्रकारे हळू हळू मुलांची संख्या वाढू लागली. वेटलिफ्टिंगचे बारकावे समजून घेण्यासाठी व्यवहारे यांनी स्वत: लष्करातील सतीश बिरा या वेटलिफ्टिंगपटूच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प येथे महिनाभर प्रशिक्षण घेतले. एके दिवशी व्यवहारे यांच्या एका मित्राने आपल्या मुलीलाही वेटलिफ्टिंग शिकवण्यास सांगितले. एका मुलीबरोबर अजून दोन-तीन मुली येऊ लागल्या. सध्या प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६५पर्यंत पोहचली आहे. विशेष म्हणजे त्यात मुलींची संख्या ३५पर्यंत आहे. मनमाडसारख्या ग्रामीण भागातील शहराच्या दृष्टीने हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. या सर्व मुली सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यामुळे  वेटलिफ्टिंगसाठी विशेष आहार घेण्याइतपत त्यांची आर्थिक परिस्थिती नसली तरी जे मिळेल त्यावर त्या प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत.

डिसेंबर २०१०मध्ये सांगली येथे झालेल्या ५६व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्व गटांमध्ये पदक मिळवण्याची किमया केली. या कामगिरीमागील किमयागार संघाचे प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे हेच ठरले. विद्यार्थ्यांमध्ये वेटलिफ्टिंगची आवड निर्माण करण्यात व्यवहारे यांना व्यायामशाळेचे अध्यक्ष जयरामबाबा सानप, मोहनराव गायकवाड, बाळासाहेब पाटील, पुरुषोत्तम धारवाडकर, दिनेश धारवाडकर तसेच शाळेच्या आतापर्यंतच्या सर्व मुख्याध्यापकांचे सहकार्य मिळाले. खेळाडूंची प्रगती पाहून व्यायामशाळेने बँकेतून कर्ज काढून अद्ययावत बार उपलब्ध करून दिले. सध्या वेटलिफ्टिंगचे तीन संच असून त्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका संचाची किंमत अडीच लाख इतकी आहे. या व्यायामशाळेत वापरल्या जाणाऱ्या इतर दोन संचांची किंमत ७० ते ७५ हजार रुपयांपर्यंत आहे. सकाळ, सायंकाळ साधारणपणे दोन तास व्यवहारे यांची ही आगळीवेगळी शिकवणी सुरू असते. या शिकवणीचे वैशिष्टय़े म्हणजे त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. आडनाव व्यवहारे असले तरी खेळाडूंना शिकवण्यात ते कोणताही व्यवहार करीत नाहीत. दिवाळीच्या सुटय़ा असो किंवा मे महिन्याच्या. ही शिकवणी कायम सुरू असते.

पदकांचे अर्धशतक

राज्यात सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर या शहरांच्या वेटलिफ्टिंगमधील वर्चस्वास हादरा देत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी आतापर्यंत शालेय तसेच राष्ट्रीय युवा, कनिष्ठ स्पर्धामध्ये मिळवलेल्या पदकांची संख्या अर्धशतकापुढे जाते. राज्यस्तरीय युवा, कनिष्ठ आणि वरिष्ठ स्पर्धेमध्ये मागील पाच वर्षांपासून सांघिक विजेतेपद मनमाडच्या खेळाडूंमुळे नाशिककडे आहे. अर्थात ही सर्व किमया प्रवीण व्यवहारे यांच्यामुळेच झाली. २०१०-११ या एकाच वर्षांत व्यवहारे यांच्या धनंजय रूपवते, ईश्वर इंगळे, सलमान पठाण, चेतन चौधरी, मोहित मकवाना, अकीब तांबोळी, अश्विनी चारवेकर, प्राजक्ता वेताळ, श्रद्धा माळवतकर या नऊ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.

इच्छापूर्ती

आपल्या एकातरी विद्यार्थ्यांने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवावे, ही प्रवीण व्यवहारे यांची इच्छा निकिता काळेने पूर्ण केली. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सप्टेंबरमध्ये झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत निकिताने ६९ किलो वजनी गटात ७३ किलोपर्यंत स्नॅच आणि ९० किलोपर्यंत क्लीन जर्क असे एकूण १६३ किलो वजन उचलून आपल्या प्रशिक्षकास सुवर्णपदकाची भेट दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण मिळवणारी निकिता ही नाशिक जिल्ह्य़ातील पहिलीच खेळाडू ठरली. बँकॉक येथे एप्रिलमध्ये झालेल्या जागतिक युवा स्पर्धेसाठीही भारतीय संघात तिची निवड झाली होती. सलग तीन वर्षांपासून राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत निकिताने सुवर्ण मिळविले. डिसेंबर २०१६मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या युवा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत  सुवर्ण आणि कांस्य अशी कमाई केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर पाच सुवर्ण, दोन रौप्य, एक कांस्य, राज्य स्तरावर नऊ सुवर्ण, एक रौप्य याप्रमाणे एकूण १५ सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी निकिताची आतापर्यंतची कामगिरी आहे. निकिताकडून व्यवहारे यांना आता ऑलिम्पिक पदकाची आशा असून त्यासाठी २०२० आणि २०२४चे ऑलिम्पिक हे लक्ष्य ठेवले आहे.

प्रशिक्षक ते पालक अशी जबाबदारी

क्रीडा शिक्षक असलेल्या प्रवीण व्यवहारे यांच्यामुळे शरीरसौष्ठव आणि कबड्डी यामध्ये दबदबा असणाऱ्या मनमाडची वेटलिफ्टिंगमध्येही ‘दणकट’ ओळख होऊ लागली आहे. आपल्या खेळाडूंना केवळ प्रशिक्षण न देता त्यांची एक पालक म्हणूनही ते जबाबदारी स्वीकारतात. त्यामुळेच त्यांचा एकही खेळाडू कोणत्याही प्रकारचे व्यसन करीत नाही. राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे सहसचिव आणि जिल्हा संघटनेचे सचिव म्हणून काम पाहणारे व्यवहारे यांचा भर अभ्यास आणि निरीक्षण यावर अधिक असतो. आजपर्यंत अनेक राष्ट्रीय स्पर्धासाठी प्रशिक्षक, पंच अशी भूमिका त्यांनी पार पाडली आहे. २००७मध्ये राष्ट्रीय व्दितीय श्रेणीची पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नवी दिल्ली येथे २०१०मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तसेच त्यापूर्वी पुणे येथे २००८मध्ये झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगसाठी क्रीडा सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या स्पर्धामधील अनुभव त्यांना खेळाडूंना शिकवताना उपयुक्त ठरला. स्वत:ला अद्ययावत ठेवण्यासाठी व्यवहारे हे वेगवेगळ्या स्पर्धाच्या ठिकाणी भेटणाऱ्या ज्येष्ठ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेत असतात. कधी इंटरनेटचाही आधार घेतात. त्यांच्या कार्याची दखल घेत या वर्षी त्यांना राज्य शासनाच्या उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक जिल्हा पुरस्काराने गौरवण्यात आले.