मितालीच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेटच्या पंढरीत विजयी पताका फडकवावी, यासाठी देशभरातून भारतीय संघावर सदिच्छांची बरसात सुरु आहे. यात सामान्य क्रिकेट चाहत्यांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलिवूडमधील कलाकार आणि भारतीय पुरुष संघांतील क्रिकेट दिग्गजांचा समावेश आहे. भारतीय महिलांनी विश्वचषक घेऊन मायदेशी परतावे, ही आस तमाम क्रिकेट चाहत्यांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र आहे. सोशल मिडीयावर महिला संघावर शुभेच्छाचा वर्षाव सुरु असताना ओडिशातील पुरीच्या समुद्र किनाऱ्यावर एका अप्रतिम शिल्पाच्या माध्यमातून भारतीय संघाला सलाम करण्यात आलाय. प्रसिद्ध शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी महिला संघाला प्रोत्साहित करण्यासाठी वाळूपासून एक शिल्प तयार केलयं. भारतीय संघाने यजमान इंग्लंडला नमवून मायदेशी परतावे,  यासाठी शिल्पाच्या माध्यमातून खास शुभेच्छा देण्यात आल्यात.

या अप्रतिम शिल्पाविषयी पटनायक म्हणाले की, यंदाच्या विश्वचषकातील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल संघाला आणि कर्णधार मितालीला शुभेच्छा देण्यासाठी हे शिल्प तयार केले आहे. भारतीय महिला ज्या मैदानात इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना खेळत आहेत. त्याच मैदानात भारताने पहिला विश्वचषक जिंकला होता. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पुरुष संघाने लॉर्डसच्या मैदानावर इतिहास रचला होता. त्यानंतर २००७ मध्ये भारतीय पुरुष संघाने दक्षिण आफ्रिकेत रंगलेल्या टी-२० विश्वचषकात चमत्कारिक कामगिरी केली. धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने २०११ मध्ये दुसरा विश्वचषक जिंकला. अर्थात क्रिकेटच्या मैदानात भारताने एक टी-२० आणि ५० षटकांच्या सामन्यातील दोन विश्वचषक असे तीनवेळा जेतेपदावर नाव कोरले. लॉर्डसवर इंग्लंडला पराभूत करुन भारतीय महिलांनी इतिहास रचला तर महिला संघाचा पहिल्या विश्वचषकासह भारताचा हा चौथा विश्वचषक ठरेल.