देवधर करंडक क्रिकेट स्पध्रेच्या विजेतेपदाप्रमाणेच विश्वचषकाच्या संभाव्य भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी निवड समितीचे लक्ष वेधण्याची चढाओढ हे अंतिम फेरीचे प्रमुख आकर्षण ठरले. त्यामुळेच हा सामना उत्तरोत्तर अधिक रंगला. पण धावांचा पाठलाग करताना पश्चिम विभागाचे एकेक फलंदाज तंबूत परतले आणि २४५ धावांत त्यांचा डाव आटोपला. वेगवान गोलंदाज अशोक दिंडाच्या भेदक माऱ्याच्या बळावर पूर्व विभागाने २४ धावांनी विजय मिळवत तब्बल दहा वर्षांनी देवधर करंडकावर नाव कोरले. ३३ धावांत ४ बळी मिळवणाऱ्या दिंडालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
विजयासाठी २७० धावांचे आव्हान स्वीकारलेल्या पश्चिम विभागाची दिंडाने धारदार आक्रमण करीत प्रारंभीच ३ बाद ३७ अशी केविलवाणी अवस्था केली. दिंडाचा गोलंदाजीचा पहिला स्पेल ६-०-२२-३ असा होता. परंतु महाराष्ट्राच्या केदार जाधवने हिंमतीने खेळत किल्ला लढवला. त्याने ८ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ९१ चेंडूंत ९७ धावांची खेळी साकारली. परंतु दुर्दैवाने तो शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. सूर्यकुमार यादवने (३५) फक्त एक बाजू सावरून धरली. पण दिंडाने हा अडसरसुद्धा दूर केला. बिपलाप समंत्रेने धवल कुलकर्णीला बाद करून पश्चिमेच्या डावापुढे पूर्णविराम दिला आणि पूर्वेने आपला जल्लोष साजरा केला.
तत्पूर्वी, मनोज तिवारी, विराट सिंग आणि बिपलाप समंत्रा यांच्या अर्धशतकांच्या बळावर ८ बाद २६९ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. पूर्व विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली खरी, पण धवल कुलकर्णी आणि डॉमनिक मुथ्थूस्वामी यांनी त्यांची पहिल्या १० षटकांत २ बाद १९ अशी अवस्था केली.
श्रीवत्स गोस्वामी आणि इशांक जग्गी या सलामीवीरांनी निराशा केल्यावर तिवारीला २१ धावांवर असताना यष्टीरक्षक स्मिथ पटेलने जीवदान दिले. मग मात्र तिवारीने आपल्या सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करीत विराट सिंगसोबत खेळपट्टीवर टिकाव धरत पश्चिमेचे दडपण झुगारून दिले. सलग दुसऱ्या शतकासाठी उत्सुक असलेल्या तिवारीने अक्षर पटेलला एक आणि युसूफ पठाणला तीन षटकार ठोकून क्रीडारसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. परंतु फिरकी गोलंदाज केदार जाधवने तिवारीचा त्रिफळा उडवून त्याचे स्वप्न उद्ध्वस्त केले. तिवारी-विराट यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर समंत्रा (६०) आणि सौरभ तिवारी यांनी पाचव्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी करून अखेरच्या षटकांमध्ये धावांचा वेग वाढवला.

संक्षिप्त धावफलक
पूर्व विभाग : ५० षटकांत ८ बाद २६९ (मनोज तिवारी ७५, विराट सिंग ५४, बिपलाप समंत्रा ६०; धवल कुलकर्णी २/३५, डॉमनिक मुथ्थूस्वामी २/५७) विजयी वि.  पश्चिम विभाग : ४७.२ षटकांत सर्व बाद २४५ (केदार जाधव ९७, सूर्यकुमार यादव ३५; अशोक दिंडा ४/३३, शाहबाद नदीम २/४२)
सामनावीर : अशोक दिंडा.