भारताचा फिरकीपटू आर अश्विन IPL 2020ची घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. IPL 2019मध्ये अश्विनने राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद केलं होतं. त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. त्याबाबत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिनेश कार्तिकने म्हटलं होतं की मंकडिंग हा एक नियम आहे. दिग्गज क्रिकेटपटू, ICC आणि MCCनेदेखील ‘मंकडिंग’ला मान्यता दिली आहे. त्यामुळे अशाप्रकारे गडी बाद करणाऱ्या खेळाडूकडे किंवा संघाकडे नकारात्मक दृष्टीने का पाहिलं जातं हे मला कळत नाही. त्याच मुद्द्यावर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

दिनेश कार्तिकने आपल्या ट्विटमध्ये क्रिकेट जाणकार आणि माजी क्रिकेटपटूंना आपले मत मांडायचे आवाहन केले होते. त्यावर कमेंट करत मांजरेकर यांनी कमेंट केली. “(दिनेश कार्तिकच्या मताशी) मी १००% सहमत आहे. आतापासून आपण साऱ्यांनी चेंडू टाकण्याआधीच फलंदाज क्रीजमधून बाहेर निघत असेल तर त्याला नकारात्मक दृष्टीने किंवा दोषी ठरवण्याच्या दृष्टीने विचार करायला हवा”, असे मांजरेकर यांनी ट्विट केले.

अश्विनने केली फ्री बॉलची मागणी

दिनेश कार्तिकच्या ट्विटवर अश्विननेदेखील आपले मत व्यक्त केले. “गोलंदाजांसाठीदेखील फ्री बॉलचा नियम लागू करण्याच यायला हवा. जर फलंदाज त्या चेंडूवर बाद झाला तर त्या संघाचे पाच गुण वजा केले जातील असा नियम असायला हवा. फ्री हिट या नियमामुळे फलंदाजांना संधी मिळाली, तशीच गोलंदाजांनाही संधी मिळायला हवी. कारण हल्ली गोलंदाजांची कशी धुलाई केली जाते याच कारणासाठी क्रिकेटचे सामने बघितले जात आहेत”, असे ट्विट करत अश्विनने मागणी केली.