भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीची झलक पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची दुरावस्था झाली होती. संकटात सापडलेल्या भारतीय संघाच्या मदतीसाठी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या धावून आला. पांड्यानं ९० धावांची दमदार खेळी केली. मात्र, फलंदाजी करताना असताना पांड्याच्या बुटाची लेस अचानक सुटली होती. पायात पॅड असल्यामुळे हार्दिक पांड्याला आपल्या बुटाची लेस बांधता येत नव्हती. त्याचवेळी क्षेत्ररक्षण करणारा ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर धावत आला. वॉर्नरनं पांड्याच्या बुटाची लेस बांधत खिलाडूवृत्तीचं दर्शन दिलं.

आयसीसीनं पांड्या आणि वॉर्नर यांच्या या प्रसंगाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर खात्यावर पोस्ट केला आहे. तसेच वॉर्नरच्या खिलाडूवृत्तीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. नेटकरी वॉर्नरचं तोंडभरुन कौतुक करत आहेत.

दरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ६६ धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ ५० षटकांत ३०८ धावांपर्यंत मजल मारु शकता. ऑस्ट्रेलियाकडून स्मिथ आणि फिंच यांनी दमदार शतकी खेळी केली. तर भारताकडून हार्दिक पांड्या आणि शिकर धवन यांनी अर्धशतकी खेली केली. तीन एकदिवसीय सामन्याची मालिकेत ऑस्ट्रेलिया १-० नं आघाडीवर आहे.