मेलबर्न : व्यग्र आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या तीन वेगवान गोलंदाजांना भारताविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी विश्रांती दिली आहे.

मेलबर्न येथे नुकत्याच झालेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात पॅट कमिन्सने गोलंदाजी आणि फलंदाजीतही योगदान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी २०१९ मोसमासाठी खेळाडूंना तंदुरुस्त करण्याकरिता विश्रांती देण्याचे ठरवले आहे. या वर्षी विश्वचषक स्पर्धेसह अ‍ॅशेस दौरा या दोन महत्त्वाच्या आव्हानांना ऑस्ट्रेलियाला सामोरे जावे लागणार आहे.

त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने कमिन्स, स्टार्क, हेझलवूड या वेगवान त्रिकुटाला विश्रांती देण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. ‘‘या तिघांना तीन एकदिवसीय सामन्यांसाठी खेळवले नाही तर ते पुढील दोन कसोटी सामन्यांसाठी ताजेतवाने होऊन परततील. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा घटक आहे, पण त्याने प्रत्येक सामन्यात खेळायलाच हवे का? जर त्याला प्रत्येक सामन्यात खेळवले तर विश्वचषक आणि अ‍ॅशेस दौऱ्यासाठी तो तितक्याच जोशाने खेळू शकणार नाही,’’ असे लँगर यांनी सांगितले.

कमिन्सने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत तीन सामन्यांत २०.०७च्या सरासरीने १४ बळी मिळवले आहेत. दुखापतीमुळे तो इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेला आणि यूएईमधील पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांना मुकला होता.