ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारी सुरुवात होत असून भारताची अव्वल दर्जाची खेळाडू सायना नेहवाल हिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
२३ वर्षीय सायनाला गेले दीड वर्षे अव्वल दर्जाची कामगिरी करता आलेली नाही. जानेवारीत तिने इंडियन ग्रां.प्रि. स्पर्धा जिंकली होती. या एकमेव विजेतेपदाचा अपवाद वगळता तिची कामगिरी फारशी प्रभावी झालेली नाही. उबेर चषक सांघिक स्पर्धेत तिने स्वत:चे सर्व सामने जिंकले होते. मात्र नुकत्याच झालेल्या इंडोनेशियन स्पर्धेत तिला विजेतेपद मिळविता आले नाही. या स्पर्धेतील पहिल्याच लढतीत सायनाला चीनच्या सुआन युओ हिच्याशी खेळावे लागणार आहे. सुआनने स्वीस ओपन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. तसेच गतवर्षी तिने सिंगापूर स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. आठव्या मानांकित पी.व्ही.सिंधूला पहिल्या फेरीत जपानच्या आयो ओहारी हिचे आव्हान असेल, तर पी. तुलसी हिला मलेशियाच्या जेमी सुबांधी हिच्याशी खेळावे लागणार आहे.
पुरुष विभागात बी. साईप्रणीतला पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूंशी झुंज द्यावी लागेल. एच. एस. प्रणय याच्यापुढे आठव्या मानांकित मार्क ज्वेब्लेर याचे आव्हान असणार आहे.
मिश्र दुहेरीत अरुण विष्णू व अपर्णा बालन यांना रॉस स्मिथ व रेणुगो वीरान यांच्याशी खेळावे लागेल. महिलांच्या दुहेरीत प्रज्ञा गद्रे व सिक्की रेड्डी यांची इंडोनेशियाच्या पिआ झेबादिहा बर्नादेथ व रिझकी अमेलिया प्रदीप्ता यांच्याशी गाठ पडणार आहे.
पुरुष दुहेरीत मनू अत्री व सुमेध रेड्डी यांना सातव्या मानांकित हेफेंग फुओ व नान जियांग यांचे आव्हान असेल.