ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा
गतविजेत्या व्हिक्टोरिया अझारेन्काने प्रतिस्पर्धी खेळाडूचा तासाभरात खेळ खल्लास करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हाने अटीतटीच्या लढतीत कारोलिन वॉझनिअ‍ॅकीला धक्का देत उपांत्य फेरी गाठली आहे. याचप्रमाणे सेरेना विल्यम्सनेही विजयाचा सिलसिला कायम ठेवला आहे. पुरुषांमध्ये अ‍ॅण्डी मरेने विजयी घौडदौड कायम ठेवली आहे.
अव्वल मानांकित अझारेन्काने लौकिकाला साजेसा खेळ करत महिलांच्या एकेरीमध्ये एलेना व्हेसनिनाचा चौथ्या फेरीत ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला. दहाव्या मानांकित वॉझनिअ‍ॅकीला कुझनेत्सोव्हाने पराभव करत धक्कादायक विजयाची नोंद केली. कुझनेत्सोव्हाने वॉझनिअ‍ॅकीवर २ तास आणि २८ मिनिटे चाललेल्या चौथ्या फेरीच्या सामन्यात ६-२, २-६, ७-५ असा संघर्षमय विजय मिळवला. कुझनेत्सोव्हाने पहिला सेट जिंकला खरा, पण दुसऱ्या सेटमध्ये मात्र तिला २-६ असा पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये कुझनेत्सोव्हावर मात करून वॉझनिअ‍ॅकी सामना जिंकेल असे वाटले होते, पण कुझनेत्सोव्हाने टायब्रेकरमध्ये हा सामना जिंकला व उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अमेरिकेच्या तिसऱ्या मानांकित सेरेनाने रशियाच्या मारिया किरिलेन्कोचे आव्हान ६-२, ६-० असे सहजपणे मोडीत काढले.
पुरुष एकेरीमध्ये ब्रिटनच्या तिसऱ्या मानांकित अ‍ॅण्डी मरेने १४व्या मानांकित गिल्स सायमनचा ६-३, ६-१, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
भूपती-नेस्टोरचे आव्हान संपुष्टात
ल्ल  ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचे पुरुष दुहेरीतील आव्हान महेश भूपतीच्या पराभवानंतर संपुष्टात आले आहे. भूपती आणि त्याचा सहकारी डॅनियल नेस्टोर यांना स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. पाचव्या मानांकित भूपती-नेस्टोर जोडीला इटलीच्या बिगरमानांकित सिमोन बोलेली आणि फॅबिओ फोगनिनी यांच्याकडून ३-६, ६-४, ३-६ असा पराभव पत्करावा लागला. यापूर्वीच भारताचा लिएण्डर पेस आणि त्याचा सहकारी रॅडिक स्टेपानीक यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते, तर बोपण्णा आणि त्याचा सहकारी राजीव राम यांना दुसऱ्या फेरीत प्रवेश करता आला नव्हता.

सानिया, बोपण्णा उपांत्यपूर्व फेरीत
ल्ल  मिश्र दुहेरीत सानिया  मिर्झा आणि तिचा अमेरिकेचा सहकारी बॉब ब्रायन यांनी अबिगेल स्पीअर्स आणि स्कॉट लिप्स्की यांचा ४-६, ६-१, १०-४ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
मिश्र दुहेरीच्या अन्य सामन्यात रोहन बोपण्णा आणि सू-वेई-हसिएह जोडीने डॅनिएला हंटुचोव्हा आणि फॅबिओ फोगनिनी यांचा ६-१, ७-५ असा पराभव केला आहे. सानिया आणि बोपण्णा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपांत्यपूर्व फेरी जिंकली तर उपांत्य फेरीत हे दोन्ही भारतीय खेळाडू आमने-सामने येतील.