भारतीय संघाचा सध्या विंडिज दौरा सुरू आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. त्यानंतर २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत कसोटी मालिका रंगणार आहे. हा दौरा संपण्यासाठी अद्याप सुमारे २० दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण तरीदेखील टीम इंडियाच्या एका सदस्याला तडकाफडकी मायदेशी परत बोलवण्यात आले आहे. BCCI ने हा आदेश दिला आहे.

भारताच्या संघाबरोबर असलेले संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना दौरा सोडून ताबडतोब भारतात परत येण्याचे आदेश BCCI कडून देण्यात आले आहेत. बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हे आदेश दिले आहेत. भारताच्या विंडिजमधील उच्चायुक्त कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी गैरवर्तणुक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने मायदेशी बोलवून घेण्यात आले आहे. मायदेशी परतल्यानंतर त्यांना BCCI समोर हजर राहावे लागणार असून त्यांनी केलेल्या गैरवर्तणुकीबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी ‘पाणी वाचवा’ या विषयावरील एका जाहिरातीत अभिनय करावा, अशी विनंती भारताच्या परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांनी केली होती. त्यांनी या विनंतीचे पत्र संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना दिले होते. त्रिनीदीद आणि तोबॅगोमधील भारताचे उच्चपदस्थ अधिकारी यांनी ज्यावेळी सुनील सुब्रमण्यम यांना सहकार्यासाठी मेसेज केले, तेव्हा मला त्रास देऊ नका, असे उत्तर सुनील सुब्रमण्यम यांनी दिले. त्यांनी गैरवर्तणूक केल्यामुळे त्यांनी मारदेशी परत बोलवण्यात आले आहे.

“ताण आणि थकवा यामुळे संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांच्याकडून गैरवर्तणुक घडली. त्यासाठी त्यांनी बिनशर्त माफीदेखील मागितली आहे. पण आता हे प्रकरण वरिष्ठ स्तरावर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत जर BCCI ने काहीच पाऊल उचलले नाही तर त्यातून चुकीचा संदेश जाईल, म्हणून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे”, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.