करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात क्रिकेट स्पर्धा बंद करण्यात आलेल्या आहेत. केंद्र सरकारने देशातील मैदानं व Sports Complex सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र क्रिकेटपटूंसाठी आयसीसी व बीसीसीआयने सरावासाठी काही अटी व नियम घालून दिले आहेत. या नियमांचं पालन करत Outdoor Training सुरु करणारा शार्दुल ठाकूर हा भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. पालघर येखील आपल्या घराजवळील मैदानावर शार्दुलने आपला सराव सुरु केला आहे.

मात्र सरावाला सुरुवात करण्याआधी परवानगी न घेतल्यामुळे बीसीसीाय शार्दुल ठाकूरवर नाराज असल्याचं समजतंय. “शार्दुल बीसीसीआयशी करारबद्ध खेळाडू आहे, त्यामुळे त्याने सरावाला सुरुवात करण्याआधी परवानगी घ्यायला हवी होती. तसं न करता तो स्वतःच ठरवून सरावाला गेला. त्याने असं करायला नको होतं, हे योग्य झालेलं नाही.” बीसीसीआय अधिकाऱ्याने IANS वृत्तसंस्थेला माहिती दिली. मुंबईकर शार्दुल ठाकूर बीसीसीआयच्या क गटाच्या करारश्रेणीत मोडतो. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यासारख्या खेळाडूंनीही अद्याप सरावाला सुरुवात केलेली नाही. मुंबई रेड झोन एरियात येत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने अद्याप मैदानं खुली करायला परवानगी दिलेली नाही.

शार्दुल पालघरमध्ये असताना, पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानावर सरावाला सुरुवात करतो. शार्दुलसोबत सराव करण्यासाठी काही स्थानिक खेळाडूही होते, ज्यात मुंबई रणजी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेचाही समावेश होता. दरम्यान सरावाआधी सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करण्यात आल्याचं पालघर-डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. खेळाडूंनी सरावासाठी स्वतःचा चेंडू व साहित्य आणलं होतं, जे आम्ही सॅनिटाईज करुन घेतलं. यासोबतच सरावासाठी आलेल्या प्रत्येक खेळाडूचं थर्मल स्क्रिनींगही करण्यात आलं, असंही स्थानिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.