पत्नी हसीन जहाँने केलेल्या तक्रारीनंतर भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट जाहीर करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमधील अलिपूर कोर्टाने मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीद अहमद या दोघांविरोधात हे वॉरंट जाहीर केलं असून, आत्मसमर्पणासाठी १५ दिवसांची मूदत देण्यात आली आहे. या घडामोडीनंतर बीसीसीआयने शमीसंदर्भात सावध पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. आगामी आफ्रिका विरुद्ध भारत कसोटी मालिकेच्या संघ निवडीआधी बीसीसीआय मोहम्मद शमीच्या वकिलांशी चर्चा करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.
“मोहम्मद शमीसोबत आता ज्या काही घटना सुरु आहेत, त्याच्यावर आम्ही नजर ठेवून आहोत. सर्वात प्रथम आम्ही शमीच्या वकिलांशी चर्चा करणार आहोत. आम्ही या प्रकरणाची सर्व माहिती घेणार आहोत. शमीचे वकील आम्हाला जी काही माहिती देतील त्यावर आम्ही विश्वास ठेवणार आहोत. आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेआधी शमीची संघाच निवड करायची की नाही याबाबत निवड समितीसमोर एक स्पष्ट चित्र असणं गरजेचं आहे.” नाव न घेण्याच्या अटीवर बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने पीटीआयला ही माहिती दिली.
काय आहे प्रकरण?
अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप मोहम्मद शमीच्या पत्नीनं फेसबुकवरून केल्यानं गेल्यावर्षी एकच खळबळ उडाली. शमीची पत्नी हसीन जहाँने फेसबुकवर शमीच्या काही अश्लील चॅट्स आणि काही मुलींचे फोटोही अपलोड केलं होते. यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. नागपूर, कोलकाता, कराची, काश्मीर आणि बेंगळुरुतील तरुणीचे शमीशी संबंध आहेत, असा आरोप त्याच्या पत्नीनं फेसबुक पोस्टद्वारे केला होता.
हसीन जहाँने केलेल्या आरोपांनंतर या दोघांचाही वाद चव्हाट्यावर आला. मोहम्मद शमी, त्याचा भाऊ, त्याची आई हे आपला छळ करत असल्याचाही आरोपही हसीन जहाँने केला होता. पैशांसाठी आपल्याला उपाशी ठेवले गेले, माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला असाही आरोप हसीन जहाँने केला होता. आता या सगळ्या प्रकरणात पश्चिम बंगाल येथील अलीपूर कोर्टाने मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 5:10 pm