करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ठप्प झालेल्या क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा सुरु करण्याच्या दृष्टीने भारत हळुहळु एक पाऊल टाकत आहे. केंद्र सरकारने देशातील मैदानं व Sports Complex सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यानंतर बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया १० जूनपासून आपल्या खेळाडूंसाठी पटियाला येथे ट्रेनिंग कँप आयोजित करण्याच्या तयारीत आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी शर्यतीत असलेल्या पुरुष व महिला बॉक्सर्सना पटियाला येथील ट्रेनिंग कँपमध्ये आणून त्यांचा सराव सुरु करण्याचा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचा मानस आहे. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अधिकारी, भारतीय खेळाडूंचे प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यात नुकतीच एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली, ज्यात हा निर्णय घेण्यात आला.

“आतापर्यंत बॉक्सर्सनी घरातल्या घरात राहून सराव केला आहे, पण ऑलिम्पिक दृष्टीकोनातून ट्रेनिंग कँपला पर्याय नसल्याचं सर्वांचं एकमत झालं. त्यामुळे १० जूनपासून या कँपचं आयोजन करण्याचं संघटनेने ठरवलं आहे. यासाठी सरकारने दिलेल्या सर्व नियम व सूचनांचं कडक पालन केलं जाईल.” संघटनेच्या अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली. टोकियो ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत ९ खेळाडूंची निवड झालेली आहे. ज्यात अमित पांघल (५२ किलो वजनी गट), मनिष कौशिक (६३ किलो वजनी गट), विकास क्रिशन (६९ किलो वजनी गट), आशिष कुमार (७५ किलो वजनी गट), सतिश कुमार (९१+ किलो वजनी गट), एम.सी.मेरी कोम (५१ किलो वजनी गट), सिमरनजीत कौर (६० किलो वजनी गट), लोवलिना बोर्गोहेन (६९ किलो वजनी गट) आणि पुजा राणी (७५ किलो वजनी गट) यांचा समावेश आहे.