राजस्थानची भावना जाट टोक्यो ऑलिम्पिकमध्ये २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीसाठी पात्र ठरली आहे. रांची येथे झालेल्या चालण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत भावनाने राष्ट्रीय विक्रम नोंदवत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये स्थान पटकावले. या स्पर्धेत प्रियांका गोस्वामी हिला मात्र १:३१:३६ सेकंद लागल्याने तिची थोडक्यात ऑलिम्पिकची संधी हुकली. तिने रौप्यपदकावर समाधान मानले.

राजस्थानमधील राजसामंड जिल्ह्यतील छोटय़ाशा कब्रा गावातील गरीब शेतकऱ्याच्या घरातून पुढे आलेल्या भावना हिने १ तास २९ मिनिटे आणि ५४ सेकंदांत चालण्याचे अंतर पार करत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आणि सुवर्णपदक पटकावले. ऑलिम्पिक पात्रतेसाठी १:३१:०० सेकंद ही वेळ आहे. या स्थितीत त्यापेक्षा कमी वेळेत भावनाने टोक्यो ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. भावनाने नवी दिल्ली येथे २०१८मध्ये दिल्लीच्या बेबी सौम्याने १:३१:२९ सेकंदांत केलेला विक्रम मोडला.

२ ऑलिम्पिकमध्ये २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीसाठी पात्र ठरणारी भावना जाट ही दुसरी महिला खेळाडू ठरली आहे. याआधी २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये खुशबिर कौर या अ‍ॅथलेटिक्स प्रकारात पात्र ठरणारी पहिली महिला खेळाडू ठरली होती.

अ‍ॅथलेटिक्समध्ये पाचवी खेळाडू :

के. टी. इरफान (पुरुषांची २० किलोमीटर चालण्याची शर्यत), अविनाश साबळे (पुरुषांची ३००० मीटर अडथळ्यांची शर्यत), मिश्र ४ बाय ४०० मीटर सांघिक गट, नीरज चोप्रा (भालाफेक) या चार प्रकारांमधून भारताचे खेळाडू अ‍ॅथलेटिक्ससाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्या पंक्तीत आता भावनाचा समावेश झाला आहे.

एकाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नाही

भावना जयपूरमध्ये सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमच्याजवळील रस्त्यांवर गुरमुख सिहाग या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. आतापर्यंत तिने एकाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात सहभाग घेतलेला नाही. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाकडून (एएफआय) होणाऱ्या सराव शिबिरातही भावना कधी सहभागी झालेली नाही. २०१६मध्ये हैदराबाद येथील राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेद्वारे तिने वरिष्ठ पातळीवरील कारकीर्द सुरू केली. भावना सध्या भारतीय रेल्वेमध्ये कोलकाता येथे तिकीट तपासनीस पदावर काम करते. भावनाचे पुढील लक्ष्य जपानमध्ये १५ मार्चला होणाऱ्या आशियाई चालण्याच्या शर्यत स्पर्धेचे आहे.

माझे ऑलिम्पिक पात्रतेचे स्वप्न पूर्ण झाले. सरावादरम्यान मी १:२७:०० सेकंदांची वेळ गाठत होते. या स्थितीत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेन असा विश्वास होता. गेल्या काही महिन्यांमध्ये माझ्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर मेहनत घेत होते.

– भावना जाट