Ind vs Eng : भारत इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव सर्वबाद ३३२ धावांवर संपला. जोस बटलरच्या ८९ धावांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडला या डावात त्रिशतकी मजल मारता आली. ७ बाद १९८ या धावसंख्येवरून इंग्लंडने डावाला आज सुरुवात केली होती. मात्र बटलरच्या झंझावाती खेळीने इंग्लंडला तीनशेपार नेले. जर हा सामना इंग्लंड जिंकू शकला, तर त्यात बटलरच्या खेळीचा मोठा वाटा असेल. त्यामुळे स्वतःच्या वाढदिवशी बटलरने आपल्या संघाला गिफ्ट दिले असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसत आहेत.

पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने कासवाच्या गतीने खेळ करत ७ बाद १९८ धावा केल्या होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात सामन्यावर वर्चस्व राखल्यानंतर तिसऱ्या सत्रात मात्र इंग्लंडने सहा बळी गमावत स्वतःला संकटात टाकले. इंग्लंडकडून आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कुकने सर्वाधिक ७७ आणि मोईन अलीने ५० धावा केल्या. परंतु महत्वाचे मानले जाणारे ३ फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यामुळे भारत दुसऱ्या दिवशी इंग्लंडची शेपूट झटपट गुंडाळेल अशी अपेक्षा होती. पण ‘बर्थ डे बॉय’ बटलरने भारतीय गोलंदाजांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. आधी आदिल रशीद, मग स्टुअर्ट ब्रॉड आणि त्यांनंतर काही वेळ अंडरसनच्या साथीने इंग्लंडच्या डावाला आकार दिला. बटलरने दमदार अर्धशतक ठोकले.

त्यानंतर सोशल मीडियातून देखील बटलरवर कौतुकाचा वर्षाव झाला.