नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून विश्वविजेतेपदाच्या लढतीत पराभूत झाल्यानंतर भारताचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद आता पुढील वाटचालीसाठी सज्ज झाला आहे. विश्वविजेतेपद गमावल्याचे शल्य बाजूला सारून आनंदने आपल्या ४४व्या वाढदिवशी सरस कामगिरी करून लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने इंग्लंडच्या ल्युक मॅकशेन याच्यावर ४६ चालींमध्ये मात केली.
विश्वविजेतेपद गमावल्यानंतर आनंदची ही पहिलीच स्पर्धा आहे. त्यामुळे लंडन क्लासिक स्पर्धेविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मॅकशेनविरुद्धच्या लढतीत आनंदकडे काळ्या मोहऱ्या असूनही त्याने विश्वविजेतेपदाच्या दर्जाचा खेळ केला. डावाच्या मध्यभागी आनंदने चांगली व्यूहरचना मिळविण्यासाठी हत्तीचा बळी दिला. पाठोपाठ दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे वजीरही घेतले. ३१व्या चालीला मॅकशेनकडे दोन हत्ती, एक उंट व सहा प्यादी अशी स्थिती होती. आनंदकडे एक हत्ती, एक उंट, एक घोडा व सहा प्यादी अशी स्थिती होती. या स्थितीत मॅकशेनची बाजू वरचढ ठरली असती. पण आनंदने प्याद्यांचा कल्पकतेने उपयोग केला आणि मॅकशेनच्या राजाला कोंडीत पकडले. आनंदच्या प्याद्याचा वजीर होणे अटळ आहे, हे लक्षात येताच मॅकशेनने ४६व्या चालीला आपला पराभव मान्य केला. या विजेतेपदासह आपण पुढील वर्षी होणाऱ्या विश्वविजेतेपदासाठीच्या आव्हानवीराच्या स्पर्धेसाठी आपण सज्ज होत असल्याचे दाखवून दिले.