ऑलिम्पिक व जागतिक विजेत्या युसेन बोल्ट याने आगामी जागतिक मैदानी स्पर्धेतील विजेतेपदासाठी आपणच दावेदार असल्याचा इशारा दिला आहे. त्याने डायमंड अ‍ॅथलेटिक्स लीगमध्ये शंभर मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. जमैकाच्या बोल्टने हे अंतर ९.८७ सेकंदात पार केले. सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर बोल्टने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र या मोसमात अमेरिकेच्या जस्टीन गॅटलिन याने नोंदविलेली ९.७४ सेकंद ही वेळ त्याला ओलांडता आली नाही. पुढील महिन्यात बीजिंग येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे.