इकाटेरिनबर्ग (रशिया)

भारताने जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत थाटात सुरुवात केली आहे. भारताच्या ब्रिजेश यादवने पोलंडच्या मालेस्झ गोइन्स्की याच्यावर पहिल्या फेरीत निर्विवाद वर्चस्व गाजवत विजयी सुरुवात केली आहे.

इंडिया खुली आणि थायलंड खुली स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या ब्रिजेशने गोइन्स्की याचा ५-० असा पराभव केला. मात्र या सामन्यादरम्यान गोइन्स्कीच्या डोक्याला दुखापत झाली. ब्रिजेशच्या रूपाने मंगळवारी भारताचा एकमेव बॉक्सर रिंगणात उतरणार होता. त्याच्या विजयामुळे भारतीय खेळाडूंमध्ये सकारात्मक वातावरण आहे.

आक्रमक सुरुवात करत ब्रिजेशने आपल्या ताकदवान ठोशांनी प्रतिस्पध्र्याला नामोहरम केले. ब्रिजेशच्या दमदार खेळापुढे गोइन्स्कीची मात्रा चाललीच नाही. अंतिम बेल वाजली त्या वेळेला गोइन्स्कीला स्वत:च्या पायावर उभेही राहता येत नव्हते. डोक्यातून रक्त येऊ लागल्यामुळे गोइन्स्कीला दोन वेळा वैद्यकीय उपचार करून घ्यावे लागले. या विजयामुळे ब्रिजेशने अंतिम ३२ जणांमध्ये स्थान मिळवले असून त्याला पुढील फेरीत तुर्कीच्या बायराम मालकान याच्याशी लढत द्यावी लागेल.

अमित पांघल (५२ किलो), कविंदर सिंह बिश्त (५७ किलो) आणि आशीष कुमार (७५ किलो) यांना आपापल्या गटात पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ८७ देशांमधून ४५० पेक्षा अधिक बॉक्सर सहभागी होणार आहेत. या स्पर्धेद्वारे थेट ऑलिम्पिकसाठीचे स्थान मिळवण्याची संधी बॉक्सर्सना होती. मात्र आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या प्रशासनातील गलथान कारभारामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओसी) पात्रतेचे निकष हिरावून घेतले आहेत.

 

पहिल्या फेरीत मी सावध खेळ केला. पण दुसऱ्या फेरीत दमदार ठोसे लगावून मी सामन्यात पुनरागमन केले. आता पुढील लढतीसाठी मी सज्ज झालो असून तुर्कीच्या प्रतिस्पध्र्यासाठी प्रशिक्षकांनी नवी रणनीती आखली आहे.     – ब्रिजेश यादव