सिमोना हॅलेपचे स्वप्न भंगले

जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानाबरोबरच ग्रँड स्लॅम विजेतेपदावर मोहोर नोंदवण्याचे स्वप्न सिमोना हॅलेपला साकार करता आले नाही. उत्कंठापूर्ण लढतीत कॅरोलीन वोझ्नियाकी या डॅनिश खेळाडूने तिला ७-६ (७-२), ३-६, ६-४ असे हरवले आणि पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपदाचे ध्येय साकार केले.

जागतिक क्रमवारीतील पहिल्या दोन मानांकित खेळाडूंमधील चुरशीच्या लढतीमुळे चाहत्यांना अव्वल दर्जाच्या खेळाचा निखळ आनंद घेता आला. दोन तास ४९ मिनिटे चाललेल्या या सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत विलक्षण चुरस पाहावयाला मिळाली. दोन्ही खेळाडूंना वैद्यकीय मदत घ्यावी लागली. तरीही दोन्ही खेळाडूंनी फोरहँड व बॅकहँड परतीचे फटके, व्हॉलीज, नेटजवळून प्लेसिंग, अचूक सव्‍‌र्हिस असा बहारदार खेळ केला.

वोझ्नियाकीने पहिल्या सेटमध्ये पासिंग शॉट्सची नजाकत दाखवीत सव्‍‌र्हिसब्रेकसह ४-२ अशी आघाडी मिळवली. तिने दुहेरी हाताने बॅकहँड परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. तथापि, नवव्या गेममध्ये हॅलेपनेदेखील तसेच फटके मारत सव्‍‌र्हिसब्रेक मिळवला. दोन्ही खेळाडूंनी त्यानंतर आपापल्या सव्‍‌र्हिस राखल्यानंतर ६-६ अशी बरोबरी झाली. त्यामुळे टायब्रेकरचा उपयोग करण्यात आला. त्यामध्ये हॅलेपला आपल्या खेळावर अपेक्षेइतके नियंत्रण ठेवता आले नाही. टायब्रेकर ७-२ असा सहज घेत वोझ्नियाकीने पहिला सेट जिंकला.

पहिला सेट गमावल्यानंतरही हॅलेपने जिद्द सोडली नाही. दुसऱ्या सेटमध्ये तिने क्रॉसकोर्ट फटक्यांचा अप्रतिम खेळ केला. विशेषत: तिने दोन्ही कॉर्नरजवळ फटके मारत  वोझ्नियाकीची दमछाक करण्यावर भर दिला. आठव्या गेमच्या वेळी वोझ्नियाकीने सव्‍‌र्हिसबाबत केलेल्या चुका तिच्या पथ्यावर पडल्या. हा सव्‍‌र्हिसब्रेक मिळवीत हॅलेपने ५-३ अशी आघाडी घेतली. खरंतर या गेमच्या वेळी तिचा डावा पाय दुखत होता. तरीही तिने त्याकडे दुर्लक्ष करीत सव्‍‌र्हिसब्रेकपाठोपाठ स्वत:ची सव्‍‌र्हिस राखली आणि हा सेट घेतला. त्यामुळे सामन्यात १-१ अशी बरोबरी झाली.

तिसरा सेट कमालीचा रंगतदार झाला. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या सव्‍‌र्हिसब्रेक करण्याचीच रणनीती वापरली. वोझ्नियाकीने दुसऱ्या, चौथ्या व आठव्या गेमच्या वेळी सव्‍‌र्हिसब्रेक मिळवला. हॅलेपने तिसऱ्या व पाचव्या गेमच्या वेळी सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. हॅलेपने फोरहँड फटक्यांवर भर दिला. वोझ्नियाकीने फोरहँडबरोबरच बॅकहँडच्याही फटक्यांवर भर दिला. हॅलेपने सव्‍‌र्हिसब्रेक मिळवीत ४-३ अशी आघाडी मिळवली होती, मात्र नंतर तिला सव्‍‌र्हिस राखता आली नाही. दहाव्या गेममध्ये वोझ्नियाकीला महत्त्वपूर्ण सव्‍‌र्हिसब्रेक मिळाला. त्याचा पुरेपूर लाभ वोझ्नियाकीने ही गेम घेत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.

ग्रँड स्लॅमचे विजेतेपद मिळवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी मी खूप मेहनत केली होती. डब्ल्यूटीएच्या अंतिम स्पर्धेत विजेतेपद मिळविल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला होता. हॅलेपने सुरेखच खेळ केला. पाय दुखत असूनही तिने दिलेली लढत खरोखरीच कौतुकास्पद आहे.

– कॅरोलीन वोझ्नियाकी

ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत यश मिळवण्यासाठी शंभर टक्के तंदुरुस्ती असणे अनिवार्य असते, मात्र मी अपेक्षेइतकी तंदुरुस्त नव्हते. दुसऱ्या सेटमध्ये माझ्या पायात खूप वेदना होत होत्या. हा सेट संपल्यानंतर मी वैद्यकीय मदत घेतली तरीही थोडय़ाशा वेदना होत होत्या. अर्थात वोझ्नियाकीने खूपच बहारदार खेळ केला.

– सिमोना हॅलेप

फेडररच्या विक्रमीमार्गात चिलिच!

नोव्हाक जोकोव्हिच, राफेल नदाल, स्टॅनिस्लास वॉवरिंका.. जेतेपदाच्या शर्यतीतील प्रबळ दावेदार माघारी परतले असताना ३६ वर्षीय रॉजर फेडररने कमालीचे सातत्य राखताना ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सर्वाधिक १९ ग्रँड स्लॅम नावावर असलेल्या फेडररला आणखी एक जेतेपद नावावर करण्याची संधी आहे आणि त्याच्या या विक्रमी मार्गात क्रोएशियाच्या मरीन चिलिचचा अडथळा आहे. स्वित्झर्लंडमच्या फेडररची ही ३०वी ग्रँड स्लॅम अंतिम लढत असून त्याला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे सहावे जेतेपद जिंकण्याची संधी आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला नदाल, ऑस्ट्रेलियन स्पर्धेची सहा जेतेपद पटकावणारा जोकोव्हिच आणि माजी विजेता वॉवरिंका यांना दुखापतीमुळे स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला.

२०१४च्या अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदानंतर चिलिच दुसऱ्या ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी उत्सुक आहे. २०१७च्या विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याला फेडररकडून हार मानावी लागली होती. त्याची परतफेड करण्याची चिलिचला संधी आहे.

याही स्पर्धेत एकही सेट न गमावता मी घोडदौड राखली आहे. अंतिम लढतीतही सातत्य राखेन, अशी आशा करतो. चिलिचविरुद्धची लढत सोपी नक्की नसेल. अमेरिकन स्पर्धेच्या जेतेपदाने त्याला आत्मविश्वास दिलाच आहे. त्यामुळे त्याच्याकडून कडवी टक्कर मिळेल.                – रॉजर फेडरर

ती पूर्णपणे तंदुरूस्त आहे. या स्पर्धेत मला काही सामन्यांत तीन तासाहूंन अधिक काळ खेळावे लागले. आत्तापर्यंतची वाटचाल सुरेख झालेली आहे. त्यामुळे अंतिम लढतीत तसाच खेळण्याचा प्रयत्न असेल. फेडररसारख्या अनुभवी खेळाडूविरुद्ध खेळताना चुका न करण्यावर भर असेल.     मरीन चिलिच