विंडीजचा दमदार सलामीवीर ख्रिस गेल म्हणजे गोलंदाजांचा कर्दनकाळ. तो जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा गोलंदाजांना पळता भुई थोडी होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबाबत अद्याप त्याने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण Mzansi Super League या टी २० लीगमधून त्याने भावनिक होत माघार घेतल्याचे वृत्त आहे.

“जेव्हा मी तीन-चार सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतो, त्यावेळी ख्रिस गेल म्हणजे संघावरचं ओझं असतं”, असं खुद्द ख्रिस गेलने पत्रकार परिषदेत सांगितले. टी २० क्रिकेट स्पर्धेत गेल सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, पण Mzansi Super League या स्पर्धेत मात्र त्याची कामगिरी अत्यंत सुमार होती. सहा सामन्यात गेलने केवळ १०१ धावा केल्या. त्यात त्याने केवळ एक अर्धशतक लगावले. त्यानंतर ख्रिस गेलने भावनिक होत Mzansi Super League मधून माघार घेतली.

“मी केवळ एका संघाबाबत बोलत नाही. विविध टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत मी अनेक वर्षे खेळलेलो आहे. त्यानंतर मी असे अनुभवले आहे की जेव्हा ख्रिस गेल धावा करत नाही, तेव्हा तो त्या संघासाठी ओझं ठरतो. याचाच अर्थ एक विशिष्ट खेळाडू संघासाठी ओझं ठरतो. ख्रिस गेल जेव्हा काही सामन्यात अपयशी ठरतो, तेव्हा गेलने आधी काय केले आहे हे सारे लगेच विसरतात. त्यावेळी मला थोडाही सन्मान मिळत नाही”, असे तो म्हणाला.

“सुरूवातीला ख्रिस गेलला सन्मान मिळतो. पण ज्या क्षणाला ख्रिस गेल अपयशी ठरतो, तेव्हा तो माझ्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट असतो. त्यावेळी गेल हा सर्वात खराब खेळाडू ठरतो, तो सर्वात निरूपयोगी होतो. त्यामुळे मी आता या गोष्टींना सरावलो आहे,” असेही गेल म्हणाला.