पाकिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन देशांमध्ये शुक्रवारपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. रावळपिंडीत खेळवण्यात येत असलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करत असताना ८ गडी गमावून २८१ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर इमाम उल-हक आणि हारिस सोहेल यांनी महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात यशस्वी ठरली. मात्र पहिल्याच वन-डे सामन्यात पाकिस्तानचे हे फलंदाज मस्करीचा विषय ठरले आहेत.

२६ व्या षटकात इमाम उल-हकने सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने एक फटका खेळला. वास्तविक पाहता या जागेवरचा क्षेत्ररक्षक दक्ष असल्यामुळे इथे धाव घेणं शक्य नव्हतं. परंतू इमामचा साथीदार हारिस सोहेल धाव घेण्यासाठी पुढे सरसावला. हारिस धावत येत असल्याकडे इमामचं दुर्लक्ष झालं आणि तो परत आपल्या क्रिजमध्ये परतला. या सगळ्या सावळ्या गोंधळात दोन्ही फलंदाज एकाच दिशेने धावले आणि झिम्बाब्वेला एक बळी मिळाला. या प्रकारानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानच्या फलंदाजांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.

तिसऱ्या पंचांनी यावेळी पाहणी करत इमाम उल-हकला धावबाद घोषित केलं. इमामने ५८ तर सोहेलने ७१ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून चिसोरो आणि मुझराबानी यांनी प्रत्येकी २-२ तर मुंबा आणि रझा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.