CWG Opening Ceremony Live: ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट येथील कारारा स्टेडियमवर २१ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन सोहळयाला सुरुवात झाली आहे. गायन, संगीताच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाची कला, संस्कृती दाखवण्यात येत आहे. डोळयाचे पारणे फेडणारा असा हा नेत्रदीपक सोहळा सुरु आहे. ७१ देशांचे ४,५०० हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. राष्ट्रकुलमध्ये २३ क्रीडा प्रकारात एकूण २७५ सुवर्णपदके पटकावण्यासाठी खेळाडूंमध्ये चुरस असेल. ११ दिवस ही राष्ट्रकुल स्पर्धा चालणार आहे.

भारताकडून २२५ खेळाडूंचे पथक सहभागी होणार असून उदघाटन सोहळयाच्यावेळी पी.व्ही.सिंधू भारतीय चमूचे नेतृत्व करेल. रियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्यपदक विजेती कामगिरी केली होती. दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा सुशील कुमार, लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती मेरी कोम, सायना नेहवाल आणि गगन नारंगकडूनही पदकाची अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. गोल्ड कोस्ट व्हिलेजमध्ये खेळाडूंची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धा नसताना मोकळया वेळात खेळाडूंना मन रमवता यावे यासाठी व्हर्च्युअल कॉम्प्युटर गेम्स, जलतरण तलाव, कृत्रिम धबधबे, पियानोची व्यवस्था करण्यात आली आहे.