दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची सुरुवात पराभवाने झाल्यामुळे सध्या बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. भारतीय क्रिकेट संघात करण्यात आलेला बदल आणि संघाची कामगिरी या सर्व गोष्टी अधोरेखित करत क्रीडा रसिकांनी काही प्रश्न उपस्थित केले, मधल्या फळीवरील फलंदाज अजिंक्य रहाणेला पहिल्या सामन्यासाठी संघातून वगळण्यात येण्याविषयी अनेकांनीच नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघाच्या या निर्णयावर दक्षिण आफ्रिकेचे माजी गोलंदाज अॅलन डोनाल्ड यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.

‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अॅलन यांनी भारतीय संघातील या बदलावर आपले मत मांडले आहे. या मुलाखतीत त्यांनी शिखर धवन, जसप्रीत बुमराह या खेळाडूंविषयीही आपलं मत वक्तव्य केलं. पण, रहाणेला मैदानाबाहेर बसवणं अजिबातच न पटल्याचं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. दक्षिण आफ्रिकेतील जलद आणि उसळी घेणाऱ्या धावपट्टीसाठी तो योग्य खेळाडू असल्याची महत्त्वाची गोष्ट त्यांनी सर्वांसमोर ठेवली. ‘अजिंक्य रहाणेला संघातून वगळणं खूपच निराशाजनक आहे. मागच्यावेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. रहाणे हा एक असा खेळाडू आहे जो भारतीय क्रिकेट संघाच्या नौकेला स्थिर ठेवण्यात मदत करतो. मैदानातील त्याचा वावर खरच खूप प्रशंसनीय असतो’, असे डोनाल्ड म्हणाले.

वाचा : एकमेव टी२० सामन्यात द्रविडने मारले होते तीन षटकार, जाणून घ्या त्याच्याविषयीच्या काही खास गोष्टी

त्यासोबतच, पहिल्या कसोटीत रहाणेला अंतिम संघात जागा मिळाली नाही. मैदानावर खेळण्याऐवजी अजिंक्य रहाणे खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन येताना पाहून आफ्रिकन गोलंदाजांना खरचं हायस वाटलं असेल. आफ्रिकेत रहाणेची कामगिरी चांगली असल्यामुळे त्याला संघात जागा मिळायला हवी होती, असं ठाम मतही त्यांनी मांडलं. या मुलाखतीत त्यांनी भारताच्या वेगवान गोलंदाजांचीही प्रशंसा केली. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी या गोलंदाजाच्या खेळाची त्यांनी प्रशंसा केली. वेगवान गोलंदाजीची त्यांची आक्रमक शैली दक्षिण आफ्रिकन संघातील गोलंजादांपेक्षा वेगळी असली तरीही भारतीय संघासाठी दुसऱ्या कसोटी सामन्यात हेच गोलंदाच फायद्याचे ठरणार आहेत, असेही डोनाल्ड यांनी स्पष्ट केले.