करोनामुक्तीनंतर रिकाम्या स्टेडियमवर सामने होऊ शकतील; पण प्रेक्षक नसल्यामुळे सामन्याला अर्थच नसेल, कारण खेळाडूंना प्रेरणा देणारी जादू हरवली असेल, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त के ले.

करोनामुक्तीनंतर रिक्त स्टेडियमवरच क्रिकेट सामने होऊ शकतील, अशी आशा जगभरातील क्रि के ट मंडळांनी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२०  विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपासूनही प्रेक्षकांना दूर ठेवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘‘आम्हाला खेळावर उत्कट प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या साक्षीने खेळण्याची सवय असते. त्यामुळे भविष्यात प्रेक्षकांविना सामने खेळतानाच्या परिस्थितीला प्रत्येक क्रिकेटपटू कशा रीतीने सामोरा जाईल, हे मला सांगता येणार नाही,’’ असे ३१ वर्षीय कोहली म्हणाला.

‘‘प्रेक्षकांचे आणि खेळाडूंचे भावनिक नाते असते. सामन्याची उत्कंठा ते वाढवतात. रिक्त स्टेडियमवर सामने होऊ शकतील; पण वातावरणातील जादू ओसरल्याचे तीव्रतेने जाणवेल,’’ असे कोहलीने सांगितले.

‘‘जशी परिस्थिती असेल, तसे खेळावे, हे खेळानेच आम्हाला शिकवले आहे; पण प्रेक्षक नसल्याने अनेक महत्त्वाचे क्षण निर्जीव वाटतील,’’ असे संकेत कोहलीने दिले आहेत.

बेन स्टोक्स, जेसन रॉय, जोस बटलर आणि पॅट कमिन्स या क्रिकेटपटूंनी प्रेक्षकांविना सामन्यांच्या संकल्पनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे; परंतु ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर यांनी प्रेक्षकांविना ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन कठीण असल्याचे म्हटले होते. अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलसह काही क्रिकेटपटूंनी बॉर्डर यांना पाठिंबा दिला आहे.