करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात सोमवारपासून लागू करण्यात आलेल्या अंशत: टाळेबंदीसदृश नव्या निर्बंधांचा मुंबईतील क्रिकेट स्पर्धांना फटका पडला आहे. यंग कॉम्रेड शिल्ड, कांगा लीग यांसारख्या महत्त्वाच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर शालेय स्तरावरील हॅरिस-गाइल्स शिल्ड, मुलींची मनोरमाबाई आपटे स्मृती क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

गतवर्षी करोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशातील जवळपास सर्वच स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे या वेळी मार्च-एप्रिल महिन्यापासून प्रामुख्याने मुंबईतील शालेय तसेच खुल्या गटाच्या क्रिकेट स्पर्धांना प्रारंभ होण्याची अपेक्षा होती. परंतु शहरासह महाराष्ट्रात करोनाची दुसरी लहर ऐन भरात असल्याने राज्य शासनाने सर्वप्रकारची क्रीडा संकुले आणि मैदाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश रविवारी दिले. त्यामुळे यंदाही शहरातील क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याशिवाय आयोजकांकडे पर्याय नाही.

‘‘एप्रिल महिन्यात हॅरिस-गाइल्स शिल्डचे नव्या स्वरूपात आयोजन करण्याचे आमचे प्रयत्न होते. मुंबईत मुश्ताक अली आणि विजय हजारे स्पर्धेच्या सामन्यांचे यशस्वी आयोजन झाल्यानंतर आमच्या आशाही बळावल्या. परंतु करोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता आता ते शक्य नाही. राज्य शासनाच्या नियमांचे पालन करणे आम्हाला अनिवार्य असल्याने थेट पुढील वर्षीच शालेय स्तरावरील क्रिकेट स्पर्धा रंगतील,’’ असे मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) कार्यकारिणी समितीचे सदस्य नदीम मेमन म्हणाले.

याव्यतिरिक्त सध्या सुरू असलेली यंग कॉम्रेड शिल्ड तसेच पावसाळ्यात खेळवली जाणारी कांगा लीग तूर्तास पुढील आदेशापर्यंत लांबणीवर ढकलण्यात आली असून खेळाडूंच्या नोंदणीकरणाची प्रक्रियाही स्थगित करण्यात आली असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.