अभिजीत गुरू

नागपूरच्या घरी आजही आम्ही सर्व भावंडे एकत्र येऊन क्रिकेट पाहतो. सगळ्यांच्या जागा ठरलेल्या आहेत. १९९६च्या विश्वचषकातील सामन्यात सचिन बाद होऊ  नये म्हणून आम्ही आमच्या सोसायटीपासून मारुतीच्या मंदिरापर्यंत लोटांगण घातले होते. क्रिकेटसाठी मी बरीच उलाढाल केली आहे. अगदी घरातला टीव्ही रस्त्यावर आणून सामना पाहिला आहे. शाळेत असताना माझ्या परीक्षेदिवशीच भारताच्या विश्चषकाचा अंतिम सामना होता आणि दुर्दैवाने भारत त्या सामन्यात पराभूत झाला होता. त्या वेळी अनिल कुंबळेला अश्रू अनावर झाले आणि इथे आम्हालाही कुणी जवळची व्यक्ती गेल्यासारखे दु:ख झाले होते. पूर्वी विश्वचषकात २५० धावा झाल्या तरी खूप काही मिळवल्यासारखे वाटायचे. काळानुसार क्रिकेट बदलत गेले आणि त्यानुसार ते तितकेच सक्षम होत गेले. सचिनच्या पहिल्या सामन्यापासून मी त्याला पाहिले आहे. त्यामुळे भारतीय संघातील बदल मला प्रकर्षांने जाणवतात आणि आज भारतीय संघ कौशल्यश्रीमंत झाला आहे, असे मला अभिमानाने सांगावेसे वाटते. पूर्वी आपण जिंकू का, अशी हुरहुर असायची. आता आपण जिंकूच अशी खात्री वाटते. कामानिमित्त मी अनिल कुंबळे आणि सचिनला भेटलो आहे. ते दिवस मी कधीही विसरू शकत नाही. फक्त आता प्रत्यक्ष मैदानात जाऊन सामना पाहण्याची इच्छा आहे.

(शब्दांकन : निलेश अडसूळ)