भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेतही आपल्या कामगिरीचा डंका वाजवला आहे. इंग्लंडविरुद्ध सामन्यात ३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर लोकेश राहुल एकही धाव न काढता माघारी परतला. मात्र यानंतर रोहित आणि विराटने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत भारतीय संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी १३८ धावा जोडल्या.

वन-डे क्रिकेटच्या इतिहासात रोहित आणि विराट या जोडीच्या नावावरची ही सतरावी शतकी भागीदारी ठरली आहे. सर्वाधिक शतकी भागीदाऱ्या करणाऱ्यांच्या यादीत ही जोडी तिसऱ्या क्रमांकावर आहे. याचसोबत विश्वचषक स्पर्धेतली या जोडीच्या नावावरची ही पहिली शतकी भागीदारी ठरली आहे.

विराट कोहलीने संयमीपणे इंग्लंडच्या गोलंदाजीचा सामना करत अर्धशतक झळकावलं. लियाम प्लंकेटच्या गोलंदाजीवर बदली खेळाडू विन्सने विराटचा झेल पकडत भारताची जोडी फोडली. विराटने ७६ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या.