विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला होणार आहे. सलामीचे २ सामने गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध भारताचा सामना होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघ पत्रकार परिषद घेणे भारतीय प्रसारमाध्यमांना अपेक्षित होते, पण या पत्रकार परिषदेत संघाशी संबंधित व्यक्ती उपस्थित राहणार नसल्याचे समजल्याने इंग्लंडला गेलेल्या भारतीय प्रसारमाध्यमांनी टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला.

स्पर्धेतील पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरण्याआधी टीम इंडियावर विचित्र प्रसंग ओढवला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी मंगळवारी कसून सराव केला. पण, या सराव सत्रानंतर संघ व्यवस्थापनाने पत्रकार परिषदेसाठी खलील अहमद, आवेश खान आणि दीपक चहर या तिघांना पाठवले. हे तीनही खेळाडू टीम इंडियाच्या फलंदाजांना केवळ नेट्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी गेले आहेत. त्यांचा मूळ संघाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची घोर निराशा झाली.

सामान्यतः कोणत्याही मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाच्या सामन्याच्या एक-दोन दिवस आधी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू किंवा संघाचे प्रशिक्षक किंवा सपोर्ट स्टाफमधील जबाबदार व्यक्ती या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहतात. त्यानुसार संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री किंवा संघातील वरिष्ठ खेळाडू पत्रकार परिषदेला येणे अपेक्षित होते. पण तसे न झाल्यामुळे नाराज झालेल्या प्रसारमाध्यमांनी या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकल्याचे सांगण्यात येत आहे.

पत्रकार परिषदेला अपेक्षित असलेली कोणतीही जबाबदार व्यक्ती का हजर राहिली नाही? असा प्रश्न भारतीय संघाच्या प्रसिद्धी विभागाला विचारण्यात आल्यानंतर भारताचे विश्वचषकाचे सामने अद्याप सुरु झालेले नाहीत, असे उत्तर देण्यात आले. पण या आधी अनेकदा अशा पद्धतीच्या पत्रकार परिषदांना अपेक्षित व्यक्ती हजर राहिली होती. मग या वेळी ज्या खेळाडूंना संघाबाबतच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा अधिकार नाही, अशा खेळाडूंना पत्रकार परिषदेत पाठवण्याचा फायदा काय? असा सवाल प्रसारमाध्यमांकडून करण्यात आला आणि त्यांच्याकडून पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्यात आला.