भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन धोनीच्या नेतृत्वाखालच्या शेवटच्या मॅचमध्ये इंग्लंडने भारत ‘अ’ संघाला ३ विकेट्सने पराभूत केलं. कॅप्टन म्हणून धोनीच्या नेतृत्वाखाली खेळली गेलेली ही शेवटची मॅच भारतीय संघाला गमवावी लागली असली तरी या मॅचमध्ये माहीने सगळ्यांची मनं जिंकली.

अखेरच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने आपल्या चाहत्यांना खूश करत इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. धोनीने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सराव सामन्यात ४० चेंडूत ६८ धावा वसुल करून संघाला ३०० चा आकडा गाठून दिला. अंबाती रायुडूचे दमदार शतक आणि युवराज सिंगने अर्धशतकी खेळी साकारल्यानंतर धोनीने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत ६८ धावा ठोकल्या. धोनीने गेल्याच आठवड्यात भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. धोनीच्या निवृत्तीचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का ठरला. येत्या १५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे.

 

VIDEO: कर्णधारपदाच्या अखेरच्या सामन्यात धोनीचा सत्कार

भारतीय संघाचे नेतृत्त्व विराट कोहली याच्याकडे सोपविण्यात आले आहे. पण त्याआधी सराव सामन्यांचे नेतृत्त्व धोनीकडे देण्यात आल. ‘कर्णधार’ धोनीचा अखेरचा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी ब्रेबॉर्नवर एकच गर्दी केली. सामन्याचा नाणेफेक इंग्लंडने जिंकून भारतीय संघाला फलंदाजीची संधी दिली. शिखर धवन आणि अंबाती रायुडू यांनी दमदार फलंदाजी करत चांगली कामगिरी केली. धवन बाद झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन करणाऱया युवराज सिंग याने झटपट अर्धशतक ठोकले. तर रायुडूने आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवत शतकी कामगिरी केली. त्यानंतर धोनी मैदानात उतरला आणि संपूर्ण स्टेडियमवर एकच जल्लोष सुरू झाला. धोनीने सुरूवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत ४० चेंडूत ८ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६८ धावांची खेळी साकारली. भारतीय अ संघाने ५० षटकांत इंग्लंडसमोर ३०५ धावांचे आव्हान ठेवलं. इंग्लंडने  दमदार सुरूवात करत ३ विकेट्सच्या मोबदल्यात १७८चा पल्ला गाठला . त्यानंतर कुलदीप यादवने झटपट दोन विकेट्स काढत भारताला मॅचमध्ये परत आणलं. पण त्यांनतर क्रीझवर आलेल्या सॅम बिलिंग्जने ९३ रन्स ठोकत सामन्याचं पारडं फिरवलं. सॅम बिलिंग्ज आऊट झाला खरा. पण त्याने इंग्लंडसाठी काम पूर्ण केलं होतं. यानंतरही भारताला दोन विकेट्स काढता आल्या पण शेवटी मॅच इंग्लंडने जिंकली.