यष्ट्यांमागे उभा राहणाऱ्या विकेटकिपरची खेळ खेळण्याची एक विशिष्ट पद्धत असते. काही विकेटकिपर फलंदाजावर दडपण टाकण्याच्यादृष्टीने बडबड करत असतात. तर काही गोलंदाजाला अचूक मार्गदर्शन करत संघासाठी बळी मिळवून देतात. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा असाच विकेटकिपर होता. तो नेहमी गोलंदाजाला फलंदाजाच्या उणीवा सांगत बळी मिळवून देण्यास मदत करायचा. भारतीय माजी फिरकीपटू प्रग्यान ओझाने असाच एक धोनीचा किस्सा सांगितला.

इंग्लंडच्या इयन बेलला बाद करण्यासाठी धोनीने एक मजेशीर टिपण्णी केली होती. त्याबद्दल ओझाने क्रिकेटनेक्स्टशी बोलताना सांगितलं. “धोनीसोबतची माझी सर्वात आवडती आठवण म्हणजे इंग्लंडविरूद्धचा सामना. धोनी मला म्हणाला होता की ओझा, याची घंटी वाजवून टाक. ती खूपच हासायला लावणारी टिपण्णी होती. जेव्हा आम्ही गोलंदाज खूप जास्त दडपण घेत गोलंदाजी करायला जायचोस, तेव्हा धोनी असंच काहीतरी मजेशीर बोलायचा आणि त्यामुळे आमचं दडपण निघून जायचं. क्रिकेट खेळण्याची त्याची एक वेगळीच पद्धत असायची.”

“मी अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलो. तो माझ्यासाठी एक उत्तम कर्णधार होता. कर्णधार हा नेहमी गोलंदाजांचा विचार करणारा असावा असं मला वाटतं. क्रिकेट हा बहुतांश वेळा फलंदाजांचा खेळ असतो. त्यामुळे कर्णधाराची भूमिका महत्त्वाची असते. धोनी खेळ सुरु होण्याआधी गोलंदाजांशी चर्चा करायचा आणि सामन्यात योग्य ते मार्गदर्शन करायचा”, असेही तो म्हणाला.