भारतीय हॉकी संघासाठी परदेशी प्रशिक्षक नको, त्याऐवजी भारतातील माजी ऑलिम्पिकपटूंकडे ही जबाबदारी सोपवावी, अशी मागणी आजपर्यंत अनेक वेळा झाली आहे आणि होत असते. तरीही हॉकी इंडियाने या मागण्यांकडे दुर्लक्ष करत ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलिम्पिकपटू टेरी वॉल्श यांच्याकडे भारतीय हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. भारतीय खेळाडूंची मानसिकता आणि हॉकीतील प्रतिकूल गोष्टी लक्षात घेता वॉल्श यांच्यासाठी ही जबाबदारी म्हणजे टांगती तलवारच ठरण्याची शक्यता अधिक आहे.
उत्तम दर्जाचा खेळाडू उत्तम दर्जाचा प्रशिक्षक होऊ शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र वॉल्श हे त्यास अपवाद आहेत. वॉल्श यांनी ऑस्ट्रेलियाकडून तब्बल १७५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळताना अव्वल दर्जाचा आक्रमक खेळाडू म्हणून नावलौकिक मिळविला होता. स्पर्धात्मक खेळातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आजपर्यंत मलेशिया, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, अमेरिका आदी संघांना मार्गदर्शक म्हणून काम करताना हॉकीचे द्रोणाचार्य म्हणून आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे.
हॉकी हा अतिशय वेगवान खेळ मानला जातो आणि त्यामध्ये दीर्घ काळ कारकीर्द करणे हे एक आव्हानच असते. वॉल्श यांनी तब्बल चार वेळा विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यातील १९८६च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिले होते. तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. त्यामध्ये १९७६च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी आपल्या संघाला रौप्यपदक मिळवून दिले होते. १९८४च्या ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा मान त्यांनी पटकावला होता. त्यांच्या स्टीकमध्ये चेंडू आला की तो प्रतिस्पर्धी संघाच्या गोलात जाणारच, अशीच त्यांची ख्याती होती. जबरदस्त पदलालित्य, धडाकेबाज खेळ करणे हे, त्यांच्यासाठी उजव्या हाताचा खेळ होता.
आपल्या हॉकीच्या ज्ञानाचा उपयोग अन्य खेळाडूंसाठी व्हावा, या हेतूनेच त्यांनी १९९०मध्ये स्पर्धात्मक खेळातून निवृत्त झाल्यानंतर प्रशिक्षकाची नवीन कारकीर्द सुरू केली. सुरुवातीला त्यांच्या शिक्षकी शैलीचे महत्त्व ऑस्ट्रेलियन संघटकांना कळले नाही. त्यामुळे त्यांनी मलेशियन संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी हौसेने स्वीकारली. १९९४ पर्यंत त्यांनी ही जबाबदारी पार पाडताना मलेशियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले यश मिळवून दिले. आता आव्हान देणारा तुल्यबळ संघ म्हणून मलेशियाकडे पाहिले जाते. त्याचे बरेचसे श्रेय त्यांनाच द्यावे लागेल.
त्यांच्याकडील प्रशिक्षकाची शैली ऑस्ट्रेलियन संघटकांना पटल्यानंतर त्यांनी १९९७मध्ये वॉल्श यांना आपल्याकडे ओढून घेतले. चार वर्षे त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाची भक्कम बांधणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाने १९९८मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा जिंकली. १९९९मध्ये ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स चषक स्पर्धेत विजेतेपद मिळविले तर २०००मध्ये सिडनी येथील ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाला कांस्यपदक मिळाले. याचे श्रेय अर्थातच वॉल्श यांच्या कुशल प्रशिक्षकपदाला द्यावे लागले. खेळाडूकडून त्याच्या क्षमतेइतकी कामगिरी करून घेणे, हे सांघिक खेळात खूप महत्त्वाचे असते आणि वॉल्श यांच्याकडे ती शैली आहे.
नेदरलँड्स संघाची कामगिरी खराब होत आहे, असे नेदरलँड्सच्या संघटकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी वॉल्श यांना आपल्या राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेदरलँड्सने चॅम्पियन्स स्पर्धेत विजेतेपद मिळविले तर २००४च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले. नेदरलँड्सचा संघ सध्या जगातील पहिल्या तीन क्रमांकांमधील संघ मानला जातो. त्याचे बहुतांश श्रेय वॉल्श यांनी केलेल्या उत्तम संघबांधणीला द्यावे लागेल. वॉल्श यांनी २००५ ते २०१२ या कालावधीत अमेरिकन हॉकी संघाचे तांत्रिक सल्लागार म्हणूनही जबाबदारी सांभाळली. आणखी दोन-तीन वर्षांमध्ये त्याचे परिणाम दिसतील.
परदेशी प्रशिक्षकांचा भारतीय खेळाडूंबरोबरच संघटकांशी चांगल्या रितीने संवाद होत नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. परदेशी प्रशिक्षकांना समजावून घेण्यासाठी आवश्यक असणारी मानसिकता सहसा भारतीय खेळाडूंमध्ये दिसून येत नाही. हे लक्षात घेतल्यास वॉल्श यांना प्रशिक्षक म्हणून खूप काम करावे लागणार आहे. खेळाडू, सहकारी व संघटक यांच्याशी सुसंवाद ठेवणे, हीच त्यांच्यासाठी खडतर परीक्षा असणार आहे. भारतीय हॉकी संघांसाठी मुख्य समन्वयक रोलँड ओल्ट्समन यांनीच वॉल्श यांची शिफारस केली असल्यामुळे वॉल्श यांचे काम सोपे झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य देशांनी जसे ऑलिम्पिक पदक मिळविले, तसे पदक भारत मिळवील अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.