इंग्लंडला क्रिकेटची पंढरी असे म्हटले जाते. क्रिकेट खेळाला आणखीन लोकप्रिय करण्यासाठी येथे नवनवीन प्रयोग होतच असतात. असाच एक प्रयोग इंग्लंडमध्ये सुरु आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेट आणखीन लहान करुन केवळ १०० चेंडूंचा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. इंग्लंडमध्ये सध्याच्या घडीला स्थानिक पातळीवर १०० चेंडूंच्या सामन्यांचे आयोजन केले जात आहे आणि २०२० पर्यंत या प्रकारच्या क्रिकेटची स्पर्धाही खेळवली जाणार आहे. इंग्लंडचा कर्णधार ‘इऑन मॉर्गन’ आणि ‘स्टुअर्ट ब्रॉड’ यांनीही या क्रिकेटच्या प्रकाराचे स्वागत केले आहे.

इंग्लंड क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॉलिन ग्रेव्स यांच्या मते तरुणांना सातत्याने नवनवीन गोष्टी हव्या असतात. त्यामुळे क्रिकेट खेळाला आणखीन लोकप्रिय करण्यासाठी १०० चेंडूंचा सामना खेळवण्याचा प्रयोग ते करत आहेत. तसेच देशातील क्रिकेट चाहत्यांनाही हा प्रयोग आवडू लागल्यामुळे येत्या दोन वर्षांमध्ये या क्रिकेटच्या प्रकाराची स्पर्धा आयोजित करण्याचा विचार त्यांचे इंग्लंड क्रिकेट बोर्ड करत आहे.

१०० चेंडूंचा सामना कसा खेळवणार
या सामन्यात पहिली १५ षटके नेहमी प्रमाणेच ६ चेंडूंची असतील. त्यामुळे ९० चेंडूंपर्यंत सामना नेहमी प्रमाणेच खेळला जाईल. परंतु शेवटचे षटक १० चेंडूंचे असणार आहे. त्यामुळे अखेरचे षटक टाकणाऱ्या गोलंदाजाचा खरा कस लागणार असल्याचे म्हटले जात आहे.