लॉर्ड्स कसोटीत ज्या प्रकारे भारताने नेत्रदीपक कामगिरीची नोंद केली होती, तशीच कामगिरी लीड्समध्ये उतरताच इंग्लंडच्या संघाने केली. भारतीय संघ लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या ७८ धावांवर बाद झाला. एकापेक्षा एक अशा सरस कसोटी फलंदाजांनी सुसज्ज असलेल्या टीम इंडियाचा एकही फलंदाज २० धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. रोहित शर्माने सर्वाधिक १९ धावा केल्या. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने १८ धावा केल्या. इंग्लंडने अतिरिक्त १६ धावा दिल्या अन्यथा भारतीय संघ ६०-६२ धावांवर सर्वबाद झाला असता.

इंग्लंडविरुद्ध भारताची ही तिसरी सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. याआधी १९७४ मध्ये लॉर्ड्स कसोटीत भारत ४२ आणि १९५२ मध्ये मँचेस्टरमध्ये ५८ धावांवर बाद झाला होता. आता ४७ वर्षानंतर भारतीय संघाने इंग्लंडमध्ये अशी लाजिरवाणी कामगिरी केली आहे.

भारतीय संघाने आपले शेवटचे ५ फलंदाज फक्त ११ धावांवर गमावले. टीम इंडियाची धावसंख्या ५ बाद ६७ धावा अशी होती, पण त्यानंतर सर्वबाद ७८ अशी झाली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास, भारताला एका डावात दुसऱ्यांदा १०० पेक्षा कमी धावा काढता आल्या आहेत. इंग्लंड देखील दोनदा १०० पेक्षा कमी धावांवर सर्वबाद झाला आहे.

हेही वाचा – भारतात ‘तालिबान’ची क्रिकेट टीम? ‘या’ राज्यातील स्पर्धेत घेतला सहभाग!

कसोटी क्रिकेटमधील भारताची ही नववी सर्वात कमी धावसंख्या आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अॅडलेडमध्ये टीम इंडिया फक्त ३६ धावांवर सर्वबाद झाली होती. मात्र, यानंतर टीम इंडियाने जबरदस्त पुनरागमन केले आणि मालिका २-१ने जिंकली.