वेस्ट इंडिजविरुद्ध मँचेस्टर कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. आपला पहिला डाव ३६९ धावांवर संपल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी १३७ धावांत वेस्ट इंडिजचे ६ गडी माघारी पाठवले. पण त्यानंतर अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ अर्धा तास लवकर बंद करावा लागला. या सहा बळींपैकी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने २ बळी टिपले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने एक विक्रम केला. तसेच त्याने कपिल देव, ग्लेन मॅकग्रा या दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवले.

दुसऱ्या दिवसाच्या खेळात २ बळी घेत अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध सर्वाधिक गडी बाद करणारा इंग्लिश खेळाडू ठरला. अँडरसनने वेस्ट इंडिजविरूद्ध ८७ बळी टिपले. महत्त्वाचे म्हणजे जागतिक क्रिकेटमध्येदेखील तो सर्वाधिक वेस्ट इंडिज फलंदाजांना माघारी धाडणारा तिसरा फलंदाज ठरला. ग्लेन मॅकग्रा (११०) आणि कपिल देव (८९) या दोन दिग्गज गोलंदाजांनंतर त्याने सर्वाधिक वेस्ट इंडिज फलंदाज बाद केले.

दरम्यान, इंग्लंडचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपला. ४ गडी स्वस्तात माघारी परतल्यावर मधल्या फळीतील ओली पोप आणि जोस बटलर यांनी शतकी भागीदारी करत दिवस खेळून काढला. पण दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला दोघेही लगेच बाद झाले. ओली पोपने ९१ तर जोस बटलरने ६७ धावा केल्या. तळाच्या फलंदाजांपैकी स्टुअर्ट ब्रॉडने ४५ चेंडूत ६२ धावांची फटकेबाजी केली. त्यामुळे इंग्लंडला ३५०चा टप्पा गाठता आला. केमार रोचने ४, गॅब्रियल आणि चेसने २-२ तर होल्डरने १ बळी टिपला.

वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. क्रेग ब्रेथवेट १ धाव काढून बाद झाला. कॅम्पबेल आणि होप यांनी छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण कॅम्पबेल ३२ तर होप १७ धावांवर माघारी परतले. ब्रुक्स आणि चेसदेखील एकेरी धावसंख्येवर बाद झाले. ब्लॅकवूडने २६ धावा केल्या, पण चांगली सुरूवात मिळाल्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबेपर्यंत कर्णधार जेसन होल्डर आणि डावरिच यांनी खेळपट्टीवर तग धरला.