चीनमधून जगभरात पसरलेल्या करोनाच्या दणक्याने क्रीडाविश्व गेले तीन-चार महिने ठप्प होतं. पण आता अनेक क्रीडा स्पर्धा आता सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचेदेखील मैदानावर पुनरागमन होत आहे. ८ ते १२ जुलै दरम्यान इंग्लंडच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरोधात कसोटी मालिका रंगणार आहे. करोनाचा धोका लक्षात घेत ICC ने घालून दिलेल्या नव्या नियमावलीनुसार हे सामने खेळवले जाणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव, सोशल डिन्स्टन्सिंग या साऱ्याचे भान ठेवत किमान पुढील काही काळ क्रिकेटचे सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार आहेत.

कसोटी क्रिकेट असो किंवा मर्यादित षटकांचे क्रिकेट असो, करोनाचा धोका संपत नाही तोपर्यंत क्रिकेट सामने बंद दाराआड म्हणजेच विनाप्रेक्षक खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे वातावरण निर्मितीसाठी प्रेक्षक आणि संगीताचे ध्वनी स्टेडियममध्ये वाजवण्यात येणार आहेत. प्रेक्षकांविना होणाऱ्या इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वातावरण निर्मितीसाठी विशेष प्रयोग केले जाणार आहेत. करोनापूर्व काळातील सामन्याप्रमाणेच भासणारे प्रेक्षक आणि संगीताचे ध्वनी स्पीकरच्या माध्यमातून यावेळी स्टेडियमवर क्रिकेटपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी दिमतीला असणार आहेत. रिकाम्या स्टेडियमवर प्रेक्षकांच्या वातावरण निर्मितीसाठी फुटबॉलमध्येही अशा प्रकारचे प्रयोग करण्यात आले होते. काही फुटबॉल लीगच्या सामन्यांना प्रेक्षकांचे फलकही स्टेडियमवर बसवण्यात आले होते.

दरम्यान, करोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ स्थगित झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट जैवसुरक्षित स्टेडियमवर खेळवले जाणार आहे. बेन स्टोक्स आणि जेसन होल्डर यांच्या नेतृत्वखाली दोन संघ आमने-सामने येणार आहेत. बंदिस्त स्टेडियमवर प्रेक्षकांविना होणाऱ्या या सामन्याचा आनंद क्रिकेटरसिकांना केवळ टीव्हीवरच लुटता येणार आहे. चेंडूला चकाकी आणण्यासाठी गोलंदाजांना चेंडूला लाळेचा वापर करता येणार नाही, हा सर्वात महत्त्वाचा बदल असणार आहे.

असे आहेत दोन्ही संघ

इंग्लंड – बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), झॅक क्रॉली, जोए डेनली, ऑली पोप, डॉम सिबले, ख्रिस वोक्स, मार्क वूड

वेस्ट इंडिज – जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, शाई होप, शेन डॉरिच, रोस्टन चेस, शेमार ब्रूक्स, रहकीम कॉर्नवॉल, एन्कुरमा बोनेर, अल्झारी जोसेफ, चेमार होल्डर, जॉन कँपबेल, रेमॉन रेफर, केमार रोच, जेर्मिन ब्लॅकवूड, शॅनॉन गॅब्रियल