ENG vs WI 1st Test : करोनाच्या तडाख्यानंतर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजने इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या डावात जेरमाइन ब्लॅकवूडने दमदार ९५ धावांची खेळी केली आणि संघाला ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी मिळवून दिली. पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ बळी टिपणाऱ्या गॅब्रियलला सामनावीराचा किताब मिळाला.

शेवटच्या दिवशी २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने झटपट तीन गडी गमावले. तसेच जॉन कॅम्पबेल एका धावेवर खेळत असताना रिटायर्ड होत तंबूत परतला. पण त्यानंतर रॉस्टन चेस आणि जेरमाईन ब्लॅकवूड या दोघांनी दमदार खेळी केली. त्यांनी ७३ धावांची भागीदारी केली. ब्लॅकवूड ९५ धावांवर बाद झाल्यावर कर्णधार होल्डरने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. या सामन्यातील इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

चेंडूला चकाकी आणण्यासाठी अँडरसन चेंडूला काहीतरी लावतानाचा तो व्हिडीओ आहे. ICC च्या नव्या नियमानुसार चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. फक्त घामाचा वापर करण्यास परवानगी आहे. एका युझरने अँडरसनचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात त्या युझरने दावा केला आहे की अँडरसनने चेंडूला थुंकी लावली असून त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. पण ट्विटखालील कमेंटमध्ये काही लोकांचे म्हणणं आहे की त्याने थुंकी न लावता चेंडूला कपाळावरील घाम लावला आहे. तो नक्की काय लावतो आहे हे त्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसू शकलेले नाही. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या डावात २०४ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे वेस्ट इंडिजकडे पहिल्या डावाअखेरीस शतकी आघाडी होती. त्यानंतर इंग्लडंचा दुसरा डाव ३१३ धावांवर आटोपला. अंतिम डावात वेस्ट इंडिजने २०० धावांचे आव्हान पार करत सामना जिंकला.