ट्रेलब्लेझर्सच्या विजयात एस्सेलस्टोनची चमक

डावखुरी फिरकीपटू सोफी एस्सेलस्टोन (४/९) हिच्या अप्रतिम माऱ्यासमोर व्हेलोसिटीच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे ट्रेलब्लेझर्सने महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट स्पर्धेत व्हेलोसिटीचा नऊ गडी राखून धुव्वा उडवला.

जागतिक ट्वेन्टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या एस्सेलस्टोनने झुलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाड यांच्यासह व्हेलोसिटीच्या डावाला खिंडार पाडले. व्हेलोसिची संघातील लाय कास्परेक (नाबाद ११) आणि शिखा पांडे (१०) यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे त्यांचा डाव अवघ्या ४७ धावांवर संपुष्टात आला. शफाली वर्मा (१३), डॅनियल व्ॉट (३) आणि कर्णधार मिताली राज (१) तसेच वेदा कृष्णमूर्ती (०) या व्हेलोसिटीच्या अव्वल फलंदाज सपेशल अपयशी ठरल्या. एस्सेलस्टोनने चार तर झुलन आणि राजेश्वरी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

ट्रेलब्लेझर्सने हे आव्हान कर्णधार स्मृती मानधनाच्या (७) मोबदल्यात अवघ्या ७.५ षटकांत पार केले. डिआंड्रा डॉटिन (नाबाद २९) आणि रिचा घोष (नाबाद १३) यांनी ट्रेलब्लेझर्सला सहज विजय मिळवून दिला. चार सामन्यांच्या या स्पर्धेत ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलोसिटी यांचे प्रत्येकी एक विजय झाले असून अंतिम फेरी गाठण्यासाठी शनिवारी होणाऱ्या सामन्यात सुपरनोव्हाजला ट्रेलब्लेझर्सला मोठय़ा फरकाने हरवावे लागेल.

संक्षिप्त धावफलक

व्हेलोसिटी : १५.१ षटकांत सर्व बाद ४७ (लाय कास्परेक ११, शिखा पांडे १०; सोफी एस्सेलस्टोन ४/९, झुलन गोस्वामी २/१३) पराभूत वि. ट्रेलब्लेझर्स : ७.५ षटकांत १ बाद ४९ (डिआंड्रा डॉटिन २९* , रिचा घोष १३*; लाय कास्परेक १/५).

* सामनावीर : सोफी एस्सेलस्टोन