यूरो कप २०२० स्पर्धेतल्या ‘इ’ गटातील तिसऱ्या सामन्यात स्वीडनने स्लोवाकियावर १ गोलने विजय मिळवला. या विजयासह स्वीडनने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. तर या गटात आता बाद फेरीत पोहोचण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या सत्रात स्लोवाकियाविरुद्ध स्वीडनने आक्रमक खेळी केली. दुसऱ्या सत्रात ७७ व्या मिनिटाला इमिल फोर्सबर्ग याने गोल झळकावला. पेनल्टी गोल मारण्यात आला. हा गोल गोलकिपरला अडवता आला नाही.  या गोलसह स्वीडनने सामन्यात आघाडी घेतली. त्यामुळे स्लोवाकिया संघावर दडपण आलं आणि शेवटच्या मिनिटापर्यंत बरोबरी करण्यासाठी धडपड करत राहीला. मात्र गोल झळकावता आला नाही.

‘इ’ गटात आता स्वीडनचा संघ आघाडीवर आहे. स्वीडनच्या पदरात ४ गुण पडले आहेत. तर स्लोवाकियाकडे ३ गुण, तर स्पेनकडे १ गुण  आहे. मात्र पोलंडला गुण मिळवण्यात यश आलेलं नाही.

पहिल्या सत्रात दोन्हीही संघांना गोल करण्यात अपयश आलं. स्लोवाकियाने हा सामना गमवल्याने ‘इ’ गटात चारही संघामध्ये चुरस निर्माण झाली आहे. आता उर्वरित सामन्यांवर संघांचं बाद फेरीतील भविष्य अवलंबून असणार आहे. या सामन्यात मैदानातील खेळी पाहिली तर जास्तीत जास्त वेळ फुलबॉल स्लोवाकियाच्या ताब्यात होता. स्लोवाकियाने ६०६ वेळा आपल्या खेळाडूंकडे फुटबॉल पास केला. तर स्वीडनने ४३१ वेळा आपल्या खेळाडूंकडे फुटबॉल पास केला. या सामन्यात स्लोवाकियाच्या ३, तर स्वीडनच्या एका खेळाडूला मैदानात गैरवर्तन केल्याने पिवळं कार्ड दाखवण्यात आलं. या सामन्यासाठी स्वीडनने ४-४-२, तर स्लोवाकियाने ४-२-३-१ अशी व्यूहरचना आखली आहे.

यूरोपियन चॅम्पियनशिप असो की, फिफा वर्ल्ड कप स्वीडन आणि स्लोवाकिया पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत आमनेसामने आले होते. मागच्या ५ सामन्याचं गणित पाहिलं तर स्लोवाकियाने कधीच स्वीडनला पराभूत केलेलं नाही. मागच्या ४ सामन्यात दोन पेक्षा अधिक गोल करण्यासही अपयश आलं आहे. स्लोवाकियाने यूरो कप इतिहासात दोन सामने जिंकले आहेत. यूरो चषक २०१६ स्पर्धेत रशिया आणि पोलंडला पराभूत केलं आहे.