२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावलेला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामापासून धोनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. परंतू करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे धोनीचं पुनरागमन लांबणीवर पडलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी सध्या खेळत नसला तरीही आयपीएलध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं नेतृत्व हे अजुनही धोनीच्याच हातात आहे. धोनीचा संघातील सहकारी सुब्रमण्मय बद्रीनाथने धोनीच्या कर्णधारपदाच्या शैलीबद्दल भाष्य केलं आहे. धोनी प्रत्येक खेळाडूला अतिरीक्त संधी देतो, त्या संधीचा तुम्ही फायदा उचललात तर ठीक…पण धोनीला तुमचा खेळ आवडला नाही तर मग देवही तुमची मदत करु शकत नाही असं वक्तव्य बद्रीनाथने हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.

“धोनीला नेहमी असं वाटायचं की प्रत्येक खेळाडूचा संघात एक रोल असतो. मी आयपीएल खेळत असताना मधल्या फळीत संघ अडचणीत असेल तेव्हा संघाला बाहेर काढायचं ही माझी जबाबदारी होती. कर्णधार म्हणून धोनीबद्दल सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो प्रत्येक खेळाडूला योग्य संधी देतो. जर धोनीला वाटतंय की बद्रीनाथ चांगला खेळाडू आहे तर आहे…बद्रीनाथ संघात राहणारच. मी कर्णधार म्हणून त्याला संधी देईन, त्याने चांगला खेळ करुन सिद्ध करुन दाखवावं असं धोनी नेहमी म्हणतो. पण जर धोनीला वाटलं की तुमचा खेळ संघासाठी योग्य नाही आणि तुमची सध्या संघात गरज नाही…तर देवही तुमची मदत करु शकत नाही. तो नेहमी आपल्या पद्धतीने विचार करतो.” बद्रीनाथ हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – वन-डे क्रिकेटमध्ये धोनी गांगुलीपेक्षा चांगला कर्णधार – गौतम गंभीर

भारतीय संघाकडून फारशी संधी न मिळालेला बद्रीनाथ हा स्थानिक क्रिकेटमधला महत्वपूर्ण आणि अनुभवी खेळाडू मानला जातो. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये बद्रीनाथच्या नावावर १० हजार २४५ धावा जमा आहेत. ५४.४९ च्या सरासरीने बद्रीनाथने स्थानिक क्रिकेटमध्ये ३२ शतकं झळकावली आहेत. भारतीय संघाकडून बद्रीनाथ फक्त दोन कसोटी आणि सात वन-डे सामने खेळला आहे. आयपीएलमध्ये बद्रीनाथने चेन्नई आणि बंगळुरु मिळून ९५ सामने खेळले आहेत.

अवश्य वाचा – गांगुलीने भारतीय संघ घडवला, धोनीला गोष्टी आयत्या मिळाल्या !