ऑस्ट्रेलियामधील कॅनबेरा येथील मैदानावर काल ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना रंगला. हा सामना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेलीने एकहाती जिंकवून देत घरच्या प्रेक्षकांसमोर विजश्री खेचून आणला. बेलीच्या ५१ धावांच्या मदतीने ३७ व्या षटकामध्येच ऑस्ट्रेलियाच्या प्राईम मिनिस्टर्स इलेव्हन संघाने विजय मिळवला. मात्र या समान्यामध्ये बेलीच्या दमदार खेळीऐवजी त्यांच्या फलंदाजीची आगळीवेगळी शैलीच चर्चेचा विषय ठरली. फलंदाजी करताना स्टम्पसमोर तिरका उभा राहत स्टान्स घेणाऱ्या बेलीला पाहून श्रेत्ररक्षण करणाऱ्या द. आफ्रिकेच्या खेळाडूंबरोबर अगदी कॉमेन्ट्री बॉक्समध्येही हशा पिकला.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या सोशल मिडिया अकाऊण्टवरून या मजेदार प्रसंगाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कव्हरमधून गोलंदाज गोलंदाजी करत असल्याप्रमाणे बेली फलंदाजीसाठी ऑफ साईडला तोंड करुन उभा राहिल्याचे दिसते. बेली अशा पद्धतीने फलंदाजीला उभा राहिला तेव्हा स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असणारा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिस गोंधळा आणि नंतर मात्र तो या फलंदाजीच्या शैलीवर हसू लागला. बेलीच्या फलंदाजीची शैली आणि त्यावर डुप्लेसिसला हसताना पाहून कॉमेन्ट्री बॉक्समध्येही एकच हसू फुटले. कॉमेन्ट्री करत असणारा ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली ‘सेकेण्ड स्लिपला उभा असलेला फाफ डुप्लेसिस हे पाहून मनातल्या मनात काय सुरु आहे असं म्हणत असेल’ असं म्हणाला. आणि यानंतर पुन्हा कॉमेन्ट्री बॉक्समधले सगळे समालोचक हसू लागले. या व्हिडीओमध्ये कॉमेन्ट्री बॉक्समध्ये रंगलेली हलकीपुलकी चर्चा स्पष्टपणे ऐकू येतेय. बेली थर्ड मॅनकडून गोलंदाज गोलंदाजी करत असल्यासारखा उभा आहे. ही वेगळी शैली बेलीसाठी प्रभावी ठरते. अशी फलंदाजी करताना त्याने त्याचे थाय पॅड पायाच्या मागच्या बाजूला बांधायला हवे. त्याला आपण हॅमस्ट्रिंग थाट पॅड म्हणू शकतो असे मत ब्रेट लीचा सहकारी समालोचक मार्क हॉर्वडने व्यक्त केले.

तुम्हीच पाहा हा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून खरोखरच बेली आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता की गल्ली क्रिकेट असा प्रश्न भारतीय चाहत्यांना पडल्याचे ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमच्या पेजवर पोस्ट केलेल्या व्हिडीओखालील कमेन्ट्समधून दिसते. ऑस्ट्रेलियन संघाने टिच्चून गोलंदाजी केल्याने प्रथम फलंदाजी करणारा पाहुणा संघ अवघ्या ४३ षटकांच्या आतमध्ये १७३ धावा करुन तंबूत परतला. या आव्हानाला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांकडून निवडण्यात आलेल्या प्राईम मिनिस्टर्स इलेव्हन संघाने ३७ व्या षटकातच १७४ धावा करत विजय साकारला.