मॅकलरेन संघाच्या फर्नाडो अलोन्सोच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातामुळे गालबोट लागलेल्या ऑस्ट्रेलियन ग्रां.प्रि. शर्यतीत मर्सिडीझ संघाच्या निको रोसबर्गने अव्वल स्थान पटकावले. ५७पैकी २३ फेऱ्यांमध्ये आघाडी राखणाऱ्या रोसबर्गने सलग चौथ्या शर्यतीत जेतेपदावर नाव कोरले. रोसबर्गचा सहकारी लुइस हॅमिल्टनने दुसरे स्थान मिळवले. सेबॅस्टियन व्हेटेलची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत हॅमिल्टनची आघाडी मोडून काढत रोसबर्गने बाजी मारली आहे.
अव्वल कोण यापेक्षाही चर्चा रंगली अलोन्सोच्या गाडीला झालेल्या अपघाताची. शर्यतीतील हास या नव्या संघाच्या इस्टेबन गुटिरेझ आणि मॅकलरेन संघाच्या फर्नाडो अलोन्सो यांच्यात १७व्या फेरीदरम्यान भीषण अपघात झाला. एका वळणावर पुढे जाण्याच्या प्रयत्नात अलोन्सोची गाडी गुटिरेझच्या गाडीवर आदळली. त्यानंतर गाडी एका अडथळ्याला जाऊन धडकली आणि उलटी झाली. या अपघातामुळे अलोन्सोच्या गाडीचा चक्काचूर झाला. सुदैवाने अलोन्सोला या अपघातात गंभीर दुखापत झाली नाही. ‘माझी प्रकृती स्थिर आहे. अनेक कारणांमुळे हा अपघात घडला. गाडी आणि मी सुखरूप आहोत हे नशीब आहे. गाडीतील सुरक्षा उपकरणांमुळेच मी वाचलो. ३०० किमी वेगाने आम्ही गाडी चालवतो. हे विसरून चालणार नाही’, असे अलोन्सोने सांगितले.