News Flash

आठवडय़ाची मुलाखत : भारतात फुटबॉलची वाटचाल सकारात्मक!

माझा पहिलाच भारत दौरा आहे. येथील क्रीडा संस्कृतीचा प्रचंड जुना इतिहास आहे.

गेझ्का मेंडिएटा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू

‘‘भारत म्हटले की येथील क्रीडा संस्कृतीत क्रिकेटला प्रमुख स्थान दिले जाते, त्यानंतर अन्य खेळांना स्थान दिले जाते. पण मागील चार वर्षांत या देशातील तरुण पिढीचा कल अन्य खेळांकडे वळताना दिसत आहेत. ही पिढी भारतातील फुटबॉलच्या बिजाला आपल्या आवडीचे खतपाणी घालत आहे आणि त्यामुळे या खेळाची सकारात्मक वाटचाल होताना दिसत आहे,’’ असे मत स्पेनचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू गेझ्का मेंडिएटाने व्यक्त केले. बार्सेलोना क्लबच्या या माजी खेळाडूने भारतातील फुटबॉलची वाटचालीसह, कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यशाविषयी, बार्सिलोना क्लबसमोरील आव्हानांविषयी, आगामी विश्वचषक स्पर्धेचा अंदाज आणि जगातील सर्वोत्तम खेळाडू कोण यावर परखड मते व्यक्त केली.

तू पहिल्यांदाच भारतात येत आहेस. येथील फुटबॉल संस्कृतीबाबत काय सांगशील?

हा माझा पहिलाच भारत दौरा आहे. येथील क्रीडा संस्कृतीचा प्रचंड जुना इतिहास आहे. पण कालांतराने त्यात बदल होत गेले. फुटबॉलच्या बाबतीत विचाराल तर गेल्या चार वर्षांत येथे चांगली प्रगती झालेली आहे. फुटबॉलमधील क्लबची संख्या वाढली. परदेशी आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षकही येथे येऊन काम करण्यास उत्साही आहेत. फुटबॉल हा देशातील प्रमुख खेळ नसला तरी त्याचा प्रसार योग्य दिशेने सुरू आहे.

भारतात झालेल्या कुमार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेने प्रेक्षकक्षमतेचे सर्व विक्रम मोडले. त्यावरून येथील क्रीडा संस्कृती नवे वळण घेत आहे, असे तुला वाटते का

ज्या प्रकारे लोकांनी कुमार विश्वचषक स्पर्धेला प्रतिसाद दिला, ते अनपेक्षित होते. येथील क्रीडाप्रेमींची आवड वेगळी आहे. त्यामुळे स्पर्धा आयोजकांना आणि फिफाला सुखद धक्काच होता. या प्रचंड प्रतिसादानंतर नक्की वाटते की क्रीडा संस्कृतीत बदल होतोय. पण त्यासाठी पायाभूत सुविधांची उभारणी होणे आवश्यक आहे.

जून-जुलैमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेत जर्मनी जेतेपद कायम राखण्यात यशस्वी होईल का?

अंदाज बांधणे अवघड आहे. फुटबॉल हा जादूई खेळ आहे. अखेरच्या क्षणाला लढतीत काही घडून जाते. संघातील तंदुरुस्ती आणि मानसिक तयारी यावर सारे अवलंबून आहे. ब्राझील, स्पेन, अर्जेटिना, जर्मनी, फ्रान्स हे माझे आवडते संघ आहेत. या संघाचा एक इतिहास आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दांडगा अनुभव आहे.

ला लिगामध्ये बार्सिलोनाचे जेतेपद जवळपास निश्चित आहे. पण चॅम्पियन्स लीगमध्ये समोर असलेले चेल्सीचे आव्हान ते यशस्वीपणे पेलतील का?

चेल्सीचे आव्हान ते यशस्वीपणे पेलतील, परंतु त्याच वेळी चेल्सीही विजय खेचून आणेल असे वाटते. हा खूप चुरशीचा सामना होईल. कॅम्प न्यूमध्ये बार्सिलोनाचे पारडे जड वाटत असले तरी चेल्सीसारख्या अव्वल क्लबविरुद्ध त्यांची कसोटी लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील सामन्यात मेसीच्या गोलने पराभव टळला, परंतु त्याच्यावरच विसंबून राहणे घातकी ठरू शकते. चेल्सीच्या विलियम्सवर लक्ष ठेवायला हवे.

बार्सिलोना सोडण्याचा नेयमारचा निर्णय योग्य होता का?

हा प्रश्न त्याला विचारायला हवा. पण नेयमारच्या जाण्याने बार्सिलोनाच्या कामगिरीवर परिणाम न झाल्याचा आनंद आहे. बार्सिलोना आजही त्याच ताकदीने खेळत आहे. नेयमार गुणवान खेळाडू आहे. परंतु पॅरिस सेंट-जर्मेनकडून (पीएसजी) खेळताना अजून त्याचा अपेक्षित खेळ उंचावताना दिसला नाही. आता तर दुखापतीमुळे त्याला रेयाल माद्रिदविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याला मुकावे लागणार आहे. हा पीएसजीसाठी मोठा धक्का आहे.

मेसी की रोनाल्डो, यापैकी सर्वोत्तम कोण?

हा चर्चेचा प्रश्न आहे. पण दोन्ही खेळाडू सर्वोत्तम आहेत. त्यांनी आपापल्या कौशल्याने फुटबॉल विश्वावर एक वेगळे स्थान, वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केलेला आहे. त्यामुळे मेसीच्या चाहत्यांना रोनाल्डो आवडणार नाही, तसेच रोनाल्डोच्या चाहत्यांना मेसी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 2:23 am

Web Title: footballer gaizka mendieta interview indian football
Next Stories
1 रेयाल माद्रिदचा शानदार विजय
2 अझलन शहा हॉकी २०१८ – भारताच्या हातून विजयाची संधी निसटली, इंग्लंडची अखेरच्या क्षणात बरोबरी
3 VIDEO : अबॉटच्या ‘या’ उसळत्या चेंडूमुळे दुर्दैवी आठवणींना पुन्हा जाग
Just Now!
X