ज्येष्ठ सांख्यिकी तज्ज्ञ आणि यशस्वी खो-खो प्रशिक्षक रमेश वरळीकर यांचं गुरुवारी निधन झालं. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत महिला खो-खो संघाला बळकटी देण्यात वरळीकर यांचा वाटा मोठा होता. त्यांनी घडवलेल्या नामवंत राष्ट्रीय खो-खो खेळाडूंमध्ये डॉ. हेमा नेरवणकर, प्रतिभा गोखले, रेखा राय या प्रथितयश नावांचा सहभाग आहे. १९७० पर्यंत वरळीकर यांनी खो-खो प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं.

रमेश वरळीकर हे मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाचे पदाधिकारी होते. त्याकाळी पंच म्हणून रमेश वरळीकर यांनी भरपूर काम केले होते. भाई नेरुरकर चषकात तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने पंच म्हणून यशस्वी कामगिरी वरळीकरसरांनी सांभाळली होती. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले होते. या सर्व प्रवासात वरळीकरसर स्पर्धेदरम्यान स्पर्धेची व खेळाडूंनी केलेल्या कामगिरीची नोंद ठेवत असत. १९७० पासून त्यांनी खर्‍या अर्थाने सांख्यिकीला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी खो-खो च्या नोंदणी चे पुस्तक छापले. त्यांनी सांख्यिकीचे पुस्तक छापले तसेच खो-खो खेळा बद्दल सविस्तर पुस्तके सुध्दा आणली. अशाप्रकारे त्यांनी छोटी-मोठी चौदा पुस्तके लिहिलेली आहेत. खो-खो चा इतिहास सांगताना त्यांनी मांडलेले अभ्यासपूर्ण मत आजही प्रमाण मानले जाते.

रमेश वरळीकरांच्या आग्रहामुळेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशन मध्ये सांख्यिकीचा विभाग सुरू झाला. सुरुवातीला त्यांच्यासोबत एक संच असायचा त्यात अरूण देशपांडे, मनोहर साळवी अशी ज्येष्ठ मंडळी असत. त्यांची सांखिकी पध्दत व संच भारतीय स्तरावर सुध्दा कौतुकास पात्र ठरलेला होता. एखाद्या सामन्यात एका संघाने एका डावात किती खो दिले व त्यांनी किती वेळा नियमोल्लंघन केले इथपर्यंत सर्व नोंदी ते ठेवत असत. रमेश वरळीकर म्हणजे खो-खोचा एक चालताबोलता इतिहासच होता. कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित केले की त्या-त्या प्रसंगी अभ्यासपूर्ण नोंदी समोरील खोखो प्रेमींसमोर समोर अलगद उलगडायचे. अनेक पंच वर्गांना त्यांचे मार्गदर्शन लाभलेले होते. अमरहिंद मंडळाचे ते माजी विश्वस्त. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे ते सुरुवातीला काही काळ पदाधिकारी होते. 2010 चाली त्यांनी राज्याचे प्रसिद्धी समितीचे प्रमुख पद सांभाळले होते. भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर मधून निवृत्तीनंतर त्यांनी खोची निस्सीम सेवा केली होती.

२०१० साली वियोम फाऊंडेशन तर्फे जेव्हा मुंबईत शिवाजी पार्कवर राष्ट्रीय खो-खो स्पर्धा (मुंबईतील एकमेव राष्ट्रीय खो-खो स्पर्धा) आयोजित केली होती त्यावेळी मुंबईत राष्ट्रीय खो-खो स्पर्धा पाहण्याचे एक स्वप्न पूर्ण झाल्याचे त्यांनी आवर्जून संगितले होते. मुंबई खो-खो संघटनेतर्फे दिला जाणारा एकनाथ साटम ज्येष्ठ कार्यकर्ता खो-खो पुरस्काराचे ते पहिले मानकरी होते व हा पुरस्कार त्यांना 2010 साली त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संघटनेने दिला होता.