माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू सुहास कुलकर्णी (६८ वर्षे) यांचे रविवारी ठाण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, कन्या आणि जावई असा परिवार आहे.

करोनाची लागण झाल्यामुळे त्यांना कौशल्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते, तिथेच त्यांचे निधन झाले. निवृत्तीनंतर प्रशिक्षणाचे कार्य त्यांनी हाती घेतले. याशिवाय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठांच्या टेबल टेनिस स्पर्धेतही ते सहभागी व्हायचे. इंदूर येथे २०१९ मध्ये झालेल्या राष्ट्रीय ज्येष्ठांच्या टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद त्यांनी पटकावले होते. गेली अनेक वर्षे सुहास त्यांचे भाऊ जयंत आणि बहीण नंदिनी यांच्यासमवेत टेबल टेनिससह अनेक क्रीडा प्रकारांमध्ये कार्यरत होते.